Dr. S. Jaishankar : ‘आगामी काळ ‘वर्क इन इंडिया’चा’

‘जगभरात आज सर्व क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञान आहे, पैसे आहेत; पण कुशल मनुष्यबळ नाही.
dr s jaishankar
dr s jaishankarsakal

पुणे - ‘जगभरात आज सर्व क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञान आहे, पैसे आहेत; पण कुशल मनुष्यबळ नाही. येत्या काळात त्यालाच सर्वाधिक मागणी असेल. त्यासाठी परदेशात जायची देखील गरज नाही; भारतातूनच हे काम करता येईल. ‘मेक इन इंडिया फॉर वर्ल्ड’ याप्रमाणे आगामी काळ आता ‘वर्क इन इंडिया फॉर वर्ल्ड’चा असेल’, असे मत केंद्रीय परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी शुक्रवारी (ता. १२) व्यक्त केले.

समर्थ युवा फाउंडेशन आणि युवा सुराज्य प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात एस. जयशंकर बोलत होते. ते म्हणाले, ‘पाकिस्तानबाबत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, चीनबाबत सरदार पटेल आणि अमेरिकेबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पं. जवाहरलाल नेहरूंच्या धोरणांना विरोध केला होता. पण आपण पाकिस्तानचा दहशतवाद सहन केला.

चीनवर देखील पं. जवाहरलाल नेहरू यांनी अतिविश्वास ठेवला आणि चीनसाठी अमेरिकेशी शत्रुत्व पत्करत त्यांनाही दुखावले. मात्र मोदी सरकारच्या काळात अमेरिकेशी संबंध उत्तम झाले आहेत, तेथे कोणीही निवडून आले तरी हे संबंध कायम राहतील. चीनच्या सीमेवरील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अनेक वर्षे निधीच देण्यात आला नव्हता. तो आता देण्यात आला असून चीनशी पूर्ण क्षमतेने मुकाबला करण्याची आपली तयारी आहे.’

‘कोरोना काळात काही विकसित देशांनी त्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय इतरांना लस देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्या वेळी भारताने इतर देशांना लस पुरवली. आज देशातील पन्नासहून अधिक देश असे म्हणतात की भारताने लस दिली नसती तर बाकी जगाने आमच्याकडे पाहिलेही नसते.

त्यामुळे आज जगाचा भारतावर विश्वास आहे. भारत संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचा सदस्य व्हावा, ही जगातील अनेक देशांची इच्छा आहे. ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल’, असा विश्वास जयशंकर यांनी व्यक्त केला.

डॉ. विजय चौथाईवाले यांनी जयशंकर यांची मुलाखत घेतली. या कार्यक्रमाला तरुणांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या वेळी एस. जयशंकर यांच्या ‘व्हाय भारत मॅटर्स’ या पुस्तकाच्या मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. युक्रेनमधून परत आलेल्या काही विद्यार्थ्यांनी एस. जयशंकर यांचा सत्कार केला.

याप्रसंगी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे आदी उपस्थित होते. युवा सुराज्य प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष पुनीत जोशी यांनी सूत्रसंचालन केले. कुणाल टिळक यांनी आभार मानले.

डॉ. एस. जयंशकर म्हणाले -

- भारताची परराष्ट्रनीती आमच्या काळात पन्नास टक्के पूर्वीसारखीच, मात्र पन्नास टक्के बदल झालेली.

- दहशतवादी कोणताही नियम पाळत नाही, त्यामुळे त्यांना दिलेल्या प्रत्युत्तराला देखील कोणतेही नियम असू शकत नाहीत.

- फाळणीवेळी झालेला अन्याय दूर करण्यासाठी आणि चूक सुधारण्यासाठी ‘सीएए’ आणले आहे

- मूळ भारतीय आणि भारतीय वंशाचे असे सुमारे साडेतीन कोटी नागरिक जगभरात आहेत. या सर्वांची काळजी घेणे, हे पण केंद्र सरकारचे कर्तव्य आहे.

- परदेशात आज भारतीय लोक विश्वासाने पर्यटनासाठी जाऊ शकतात, ते ‘मोदी की गॅरंटी’मुळे. युक्रेनमधून वीस हजार विद्यार्थी परत आले, ते ‘मोदी की गॅरंटी’मुळेच.

- कोरोनाची लस, फाईव्ह जी तंत्रज्ञान, चंद्रयान हा आहे ‘नवा भारत’.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com