

आश्रय मागणाऱ्यांचा व्हिसा रद्द
ट्रम्प सरकारकडून निर्णय विचाराधीन; दोन लाख जणांना फटका शक्य
वॉशिंग्टन, ता. २५ (पीटीआय) : अमेरिकेत आश्रय मागण्यासाठी अर्ज केलेल्या किंवा या मागणीच्या प्रक्रियेत असलेल्या दोन लाख परदेशी नागरिकांचे व्यावसायिक आणि पर्यटन व्हिसा रद्द करण्याची तयारी अमेरिका सरकारने सुरू केली आहे. हा निर्णय झाला, तर अमेरिकेच्या इतिहासातील व्हिसा रद्द करण्याची ही सर्वांत मोठी कारवाई ठरेल. दरम्यान, या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे.
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यापासून त्यांच्या प्रशासनाने व्हिसा अर्जदारांवरील निर्बंध सातत्याने वाढवले आहेत. अर्जदारांच्या सोशल मीडिया वापराबाबत अधिक माहिती मागविणे, व्हिसा प्रक्रियेसाठी मोठ्या रकमेचे बाँड भरण्याची अट घालणे; तसेच काही देशांच्या नागरिकांना व्हिसा देण्यावर पूर्णपणे बंदी घालणे, अशा उपाययोजना प्रशासनाने केल्या आहेत. निर्णयाला आव्हान दिले गेले नाही किंवा त्यात बदल करण्यात आला नाही, तर परराष्ट्र मंत्रालय येत्या काही आठवड्यांत २०१६ ते २०२६ या कालावधीत आश्रयासाठी अर्ज करण्याऱ्या परदेशी नागरिकांचे बी-१ आणि बी-२ व्हिसा रद्द करण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या कागदपत्रांनुसार आणि दोन अमेरिकी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई गृहसुरक्षा मंत्रालयाच्या समन्वयाने केली जाणार आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट म्हणाले, “अल्पकालीन भेटींसाठी अमेरिकेत आल्याचे सांगून त्यानंतर कायमस्वरूपी येथे राहण्यासाठी आश्रयाचा अर्ज करणाऱ्या परदेशी नागरिकांचे बिगर-स्थलांतरित व्हिसा ओळखून ते रद्द करण्यासाठी आम्ही गृहसुरक्षा मंत्रालयासोबत समन्वय साधत आहोत.” मात्र, किती व्हिसा रद्द केले जाणार आहेत, यावर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. “ही प्रक्रिया सुरू राहणार असून, व्हिसा रद्द करण्याची संख्या बदलत राहील. ही कारवाई टप्प्याटप्प्याने केली जाईल,” असे त्यांनी सांगितले.
व्हिसा रद्द केल्याने संबंधित व्यक्तींना तातडीने अमेरिकेतून हद्दपार केले जाईलच असे नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सध्या ज्यांचे आश्रय अर्ज प्रलंबित आहेत, त्यापैकी बहुतांश व्यक्तींच्या व्हिसाचा दर्जा बदलला जाईल. मात्र, त्यांना व्यावसायिक किंवा पर्यटन प्रवासी म्हणून असलेला दर्जा गमवावा लागेल. निर्णय अद्याप अंतिम झालेला नसल्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
आश्रय न मागण्याची अट
अमेरिकेत बी-१ व्हिसा सामान्यतः व्यावसायिक कारणांसाठी दिला जातो, तर बी-२ व्हिसा पर्यटन, कुटुंबीयांच्या भेटी किंवा वैद्यकीय उपचारांसाठी दिला जातो. यापैकी किती व्हिसाधारकांनी अमेरिकेत आश्रयासाठी अर्ज केला आहे किंवा सध्या ते आश्रय मागत आहेत आणि प्रस्तावित कारवाईचा नेमका किती जणांवर परिणाम होईल, हे कागदपत्रे किंवा अधिकाऱ्यांकडून स्पष्ट झालेले नाही. सध्या बी-१ आणि बी-२ व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींना अमेरिकेत आश्रयासाठी अर्ज करणार नसल्याचे स्पष्ट करावे लागते. तसेच, व्हिसाची मुदत संपल्यानंतर आपण मायदेशी परतणार असल्याचेही सिद्ध करावे लागते.
व्हिसाधारकांवर कुऱ्हाड
- गेल्या १८ महिन्यांत अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने सुमारे एक लाख ७५ हजार व्हिसा रद्द केले आहेत.
- मद्यपान करून वाहन चालविण्यापासून बलात्कार आणि दरोड्यासारख्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्या किंवा आरोपी असलेल्या व्यक्तींच्या व्हिसांचा यात समावेश आहे.
- विशेषतः पश्चिम आशियाबाबतच्या अमेरिकी धोरणांवर सार्वजनिकपणे टीका करणाऱ्या व्यक्तींचेही व्हिसा रद्द करण्यात आले आहेत.
- अमेरिका सरकारने ‘बर्थ टुरिझम’वरही कारवाई सुरू केली आहे. अमेरिकेत मुलाला जन्म दिल्यास त्याला जन्मसिद्ध नागरिकत्वाचा लाभ मिळेल, या उद्देशाने परदेशी गर्भवती महिला अमेरिकेत येत असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.