लॉकडाउनचा उपयोग ‘टेक्नोसॅव्ही’ होण्यासाठी!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

कोरोना आपत्तीच्या काळात सकारात्मक विचार करत ज्येष्ठांनी स्वतःला अपडेट केले. हातात असलेल्या स्मार्ट फोन आणि घरातील लॅपटॉपच्या मदतीने टेक्नोसॅव्ही होत काळसुसंगत पावले टाकत स्वतःला गुंतवून ठेवले आहे. ज्येष्ठ नागरिक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांचे हे विचार तरुणाईला लाजवतील, असेच ठरले आहेत.

पुण्यातील ज्येष्ठांची ‘न्यू नॉर्मल’ जीवनशैली; ऑनलाइन व्याख्याने, गाण्यांतून मनोरंजन 
पुणे - कोरोना आपत्तीच्या काळात सकारात्मक विचार करत ज्येष्ठांनी स्वतःला अपडेट केले. हातात असलेल्या स्मार्ट फोन आणि घरातील लॅपटॉपच्या मदतीने टेक्नोसॅव्ही होत काळसुसंगत पावले टाकत स्वतःला गुंतवून ठेवले आहे. ज्येष्ठ नागरिक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांचे हे विचार तरुणाईला लाजवतील, असेच ठरले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडण्यास कोणतीच संधी नसल्याने ते कंटाळले होते. त्यावर मात करण्यासाठी त्यांनी एकत्र येऊन अनेक उपक्रम हाती घेतले. या काळात बहुतांश सदस्य घरातच असल्याने कोणा ज्येष्ठ नागरिकाने नातवाकडून, तर कोणी मुलांकडून स्मार्ट फोनसह अन्य तांत्रिक गोष्टी शिकून घेतल्या. वेगवेगळ्या अॅपच्या माध्यमातून बैठका घेण्यापासून त्यासाठीची लिंक तयार करणे, ती ग्रुपमध्ये पाठविणे आदी अनेक गोष्टी शिकून घेतल्या. याद्वारे दैनंदिन बैठका घेऊन एकमेकांशी सकारात्मक बाबी शेअर केल्या. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कायम राहण्यासाठी व्याख्याने, गाण्याच्या कार्यक्रमांचे आयोजन करत वेळेचा सदुपयोग हे ज्येष्ठ करीत आहेत.

पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेचा मार्ग सुकर; वेळापत्रक जाहीर करण्यास सुरवात

मानसिक स्वास्थ्यासाठी

 • आवडते संगीत ऐकावे.
 • विनाकारण काळजी करू नये.
 • विधायक दृष्टिकोन ठेवावा.
 • आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन करावे.
 • साक्षित्वाची भावना ठेवावी.

शारीरिक स्वास्थ्यासाठी

 • व्यायामात खंड पडू देऊ नये.
 • डॉक्टरांच्या सल्ल्याने कोणता व्यायाम करावा हे ठरवावे.
 • प्राणायाम, ध्यानधारणेवर लक्ष द्यावे.
 • सूर्यनमस्कार नियमित घालावेत  व चालण्याचा व्यायाम करावा.
 • अतिरंजित बातम्या ऐकण्यापासून लांब राहावे. 

आकडे बोलतात

 • ९ कोटी देशातील ज्येष्ठ
 • १ कोटी महाराष्ट्रातील ज्येष्ठ
 • ४.५ लाख पुण्यातील ज्येष्ठ

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात निराशा आली होती. त्यानंतर संघटनेतील अन्य सदस्यांशी बोलून एकमेकांना धीर देण्यास सुरुवात केली. स्मार्ट फोनद्वारे सर्वांशी चांगल्याप्रकारे जोडले गेल्यामुळे रिकाम्या वेळेचे काय करायचे, हा प्रश्‍नच राहिला नाही. ऑनलाइन माध्यमातून लेखन व अन्य स्पर्धा घेत स्वतःला सकारात्मकरित्या गुंतवून घेतले. स्वाभाविकच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कायम राहिले आहे. भरगच्च कार्यक्रमांमुळे आता मोकळा वेळच मिळत नाही.
- मकरंद पवार, उपाध्यक्ष, मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघ, पुणे.

ज्येष्ठांनी मनाने तरुण राहणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी सकारात्मक विचार आवश्यक आहे. संयमित आहार घेत नियमित व्यायाम करावा. आत्ता घडतेय ते चांगलेच आणि पुढेही चांगलेच घडेल हा दृष्टिकोन ठेवावा. एखादी अप्रिय गोष्ट घडल्यास विनाअट स्वीकारावी. एखादी व्याधी जडल्यास निसर्गनियमाचा भाग म्हणून त्याही स्थितीत आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा. मुख्य म्हणजे भूतकाळातल्या गोष्टी उगाळत बसू नये.
- डॉ. विद्याधर बापट, मानसतज्ज्ञ

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Use lockdown to be technosavy