सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञान वापरा - प्रकाश जावडेकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

नारायणगाव - ‘‘नैसर्गिक साधनसंपत्तीला मर्यादा असल्याने या सामग्रीचा वापर काटेकोरपणे करावा. पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन, तुषार सिंचन, पिकांसाठी आच्छादनाचा वापर, पॉलिहाउस व शेडनेट शेती या तंत्रज्ञानाचा वापर करून कमी पाण्यात जास्त उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करावा. पिकांची लागवड करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रयोगशाळेतून माती व पाणी परीक्षण करून घ्यावी,’’ असे आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.

नारायणगाव (ता. जुन्नर) येथील कृषी विज्ञान केंद्राच्या (केव्हीके) वतीने आयोजित केलेल्या पीक परिसंवाद कार्यक्रमाचे उद्‌घाटन जावडेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर होते. 

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने सुमारे शंभर एकर प्रक्षेत्रात विविध पिके व फळबागांची लागवड केली असून, रोपवाटिका तयार केल्या आहेत. कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने केलेल्या मधुमक्षिका व बंदिस्त शेळीपालन केले आहे. या प्रकल्पाची पाहणी जावडेकर यांनी या वेळी केली. 

या वेळी कृषी तंत्रज्ञान संशोधन अवलोकन संस्थेचे संचालक डॉ. लाखनसिंग, पशुसंवर्धन अतिरिक्त आयुक्त डॉ. एस. एम. चव्हाण, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्यवाह रवींद्र पारगावकर, सहकार्यवाह डॉ. आनंद कुलकर्णी, ‘केव्हीके’चे शास्त्रज्ञ प्रशांत शेटे आदी उपस्थित होते.

जावडेकर म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक विषमुक्त शेती करण्यावर भर द्यावा. देशातील मध व मेणाला आंतररराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असल्याने मधुमक्षिका पालन हा शेतीपूरक व्यवसाय शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.’’ 

मेहेर म्हणाले, ‘‘आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार करण्याचे काम कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून केले जात आहे. शेतीपूरक व्यवसाय करून शेतकरी उद्योजक व्हावा, यासाठी केव्हीकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.’’

दरम्यान, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार या वेळी जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. राहुल घाडगे यांनी सूत्रसंचालन केले. पारगावकर यांनी आभार मानले.

केंद्र सरकारने निमयुक्त युरिया उत्पादनाला प्रोत्साहन दिल्यामुळे युरिया खताच्या टंचाईवर मात करण्यात यश मिळाले आहे. पंतप्रधान पीकविमा योजना देशातील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरली आहे. 
- प्रकाश जावडेकर, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री 

Web Title: Use micro irrigation technology Prakash Javadekar