#CyberCrime सायबर हल्ल्यांसाठी 'मनीमुल्स'चा वापर

Use of Moneymools for cyber attacks
Use of Moneymools for cyber attacks

पुणे : बॅंका किंवा वित्तीय संस्थांवर सायबर हल्ला करणाऱ्या हॅकर्सच्या टोळ्या चोरलेले पैसे काढण्यासाठी वेगवेगळ्या शहरांमधील काही तरुणांचा (मनीमुल्स) वापर करू लागले आहेत. दहशतवाद्यांच्या "स्लिपर सेल'च्या धर्तीवर हॅकर्सचे काम कमिशनवर करणारे "मनीमुल्स' मागील दीड वर्षापासून कार्यरत झाले आहेत. भारतासह वेगवेगळ्या देशांत झालेल्या सायबर हल्ल्यांत मनीमुल्सचा वापर झाला असल्याचे उघड झाले आहे. 

सायबर हल्ले घडवून आणण्यासाठी काही महिने ठराविक बॅंका किंवा वित्तीय संस्थांची सायबर सिक्‍युरिटी सिस्टीम हॅकर्स टोळ्यांकडून भेदली जाते. हल्ला घडविल्यानंतर पैसे काढण्यासाठी वेगळी यंत्रणा राबविली जाते. या यंत्रणेतील सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणून मनीमुल्सकडे पाहिले जाते.

हॅकर्स टोळ्यांनी चोरलेले कोट्यवधी रुपये काढण्यासाठी त्यांना मनुष्यबळाची आवश्‍यकता असते. त्यासाठी हॅकर्सच्या हस्तकांकडून वेगवेगळ्या शहरांमधील ठराविक तरुणांची (मनीमुल्स) निवड केली जाते. त्यांच्याकडून या तरुणांना डेबीट कार्ड, पैसे काढण्याचे ठिकाण, वेळ या संदर्भातील मोजकीच माहिती पुरविली जाते. 

सायबर हल्ल्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर संबंधित तरुण वेगवेगळ्या शहरांमध्ये ठरलेल्या वेळेत एटीएममधून पैसे काढतात. ते पैसे संबंधित हस्तकाकडे पोचवून ठरलेल्या टक्केवारीप्रमाणे हे मनीमुल्स आपले कमिशन घेतात. 

म्हणून एटीएममधून निघते मोठी रक्कम 

बॅंकेच्या एटीएम स्वीचवर (सर्व्हर) मालवेअरद्वारे हॅकर्स नियंत्रण मिळवतात. एरवी एटीएम मशीनमधून मर्यादीत रक्कम मिळते. मात्र, सायबर हल्ल्या वेळी संबंधित एटीएम मशीनची संगणक प्रणाली हॅकर्सच्या नियंत्रणाखाली येते. त्यामुळे मनीमुल्सला अमर्याद रक्कम काढणे शक्‍य होते.

मनीमुल्स म्हणजे काय ? 

बॉम्बस्फोट, गोळीबार यांसारखे कृत्य करण्यासाठी दहशतवादी काही निवडक तरुणांचा वापर करतात. संबंधित तरुणांवर फक्त नेमून दिलेले काम मार्गी लावण्याची जबाबदारी असते. त्याच पद्धतीने सायबर गुन्हेगारीमध्ये मनीमुल्स काम करतात. या तरुणांना चोरलेले, क्‍लोनिंग केलेले किंवा फेक डेबीट कार्ड हॅकर्सच्या हस्तकांमार्फत पोच केले जाते. कोणत्या दिवशी काय करायचे, याबाबतची माहिती त्यांना दिली जाते. मात्र आपण कोणासाठी काम करत आहोत, याविषयी कुठलीही कल्पना त्यांना नसते. पैसे काढल्यानंतर ठरल्यानुसार त्यांना त्यांचे कमिशन दिले जाते. 

कॉसमॉस सायबर हल्ला प्रकरणामध्ये सहा जणांना अटक केली आहे. ते सर्व एकाच टोळीतील आहेत. आपण कोणासाठी आणि कोणते काम करत आहोत, याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे या प्रकरणातील संशयीत आरोपींना सायबर गुन्हेगारी क्षेत्रातील "स्लिपर सेल' किंवा "मनीमुल्स' अशी ठराविक संकल्पना लावता येणार नाही. 

- ज्योतीप्रिया सिंह, पोलिस उपायुक्त, सायबर गुन्हे शाखा. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com