esakal | पुण्यात केवळ दोन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू; 90 सेकंदात नोंदणी फुल्ल
sakal

बोलून बातमी शोधा

vaccination

पुण्यात केवळ दोन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू

sakal_logo
By
ब्रिजमोहन पाटील - सकाळ वृत्तसेवा

पुणे- १८ ते ४४ वयोगटातील नागरिक लसीकरणासाठी उत्सुक असताना शहरात केवळ दोन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू आहेत. त्याची क्षमता प्रत्येकी ३५० इतकीच आहे. ऑनलाइन केंद्र निवडण्यासाठी लिंक उपलब्ध होताच अवघ्या ९० सेकंदात ७०० जणांनी बुकिंग केल्याने दोन्ही केंद्र आत्ताच लसीकरणासाठी उपलब्ध नाहीत अशी सूचना अॅपवर दिली जात होती.राज्य शासनाकडून लस उपलब्ध न झाल्याने शनिवारपासून ४५ ते पुढील वयोगटातील लसीकरण ठप्प आहे. सोमवारी सायंकाळ पर्यंतही लस उपलब्ध झालेली नसल्याने मंगळवारी देखील लसीकरण केंद्रांना टाळे असणार आहे.

शहरात सध्या १८ ते ४४ वयोगटासाठी मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालय आणि येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात लसीकरण सुरू आहे. तेथे १ ते ७ मे या दिवसांसाठी ५ हजार डोस महापालिकेकडे उपलब्ध झाले आहेत.शासनाच्या आदेशानुसार या दोन्ही केंद्रांवर प्रत्येक दिवशी जास्तीत जास्त ३५० जणांनाच लस देता येणार आहे. १८ ते ४४ वयोगटासाठी ज्यांनी आॅनलाइन बुकिंग केले आहे अशांनाच ठरवून दिलेल्या वेळेत लस दिली जात आहे. त्यासाठी कोवीन, आरोग्यसेतू, उमंग या ॲपवरून नोंदणी करता येत आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून नागरिक रेजिस्ट्रेशनसाठी प्रयत्न करत आहेत. लसीकरण केंद्र उपलब्ध नाही असा मेसेज येत आहे.

हेही वाचा: राजीव गांधी रुग्णालयात अवघ्या १८ जणांचे लसीकरण !

महापालिकेकडून प्रत्येक केंद्रावरील ३५०डोसची बुकिंग एक दिवस आधी करून घेतली जात आहे. पालिकेने सोमवारी (ता.३) दुपारी तीन वाजता ॲपवर बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यानंतर अवघ्या दीड मिनिटात कमला नेहरू आणि राजीव गांधी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांवरील बुकिंग फुल्ल दाखविण्यात आली आहे. एवढ्या प्रचंड प्रमाणात पुण्यातील नागरिक बुकिंगसाठी तयार होऊन बसले आहेत. सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव म्हणाल्या, ‘‘१८ ते ४४ वयोगटासाठी एक दिवस आधी बुकिंग करून घेतली जाते. ती लिंक दुपारी ३ वाजता उघडली जाते. यामध्ये पुण्यातील नागरिकांनी कमला नेहरू आणि राजीव गांधी रुग्णालय हे केंद्र निवडावे. पण आॅनलाइन बुकिंग लगेच संपत असल्याने अद्यापही अनेकजण प्रतिक्षेत आहेत.

हेही वाचा: ‘कोवीन’ ॲपवर नोंदणी असेल तरच लसीकरण; आता ज्येष्ठांचे लसीकरण बंद

चुकीचे केंद्र निवडल्याने लसीकरण कमी

ऑनलाईन बुकिंग करताना त्यात पुणे शहर, जिल्हा व पिंपरी-चिंचवड येथील लसीकरण केंद्रांचा समावेश असतो. नागरिक गडबडीमध्ये त्यांच्या घरापासून लांब असलेले केंद्र निवडत आहेत. त्यामुळे ३५० लसीचे बुकिंग झाले तरी अवघे १०० ते १२५ जणच लस घेत आहेत. चुकीचे केंद्र निवडल्याने त्याचा फटका इतर नागरिकांना बसत आहे. त्यामुळे ऑनलाइन बुकिंग करताना शहरातील नागरिकांनी कमला नेहरू रुग्णालयासाठी ४११०११ आणि राजीव गांधी रुग्णालयासाठी ४११००६ हा पिनकोड निवडावा तसेच जिल्ह्यातील व पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी त्यांच्या जवळच्या केंद्राचा पिनकोड टाकावा.

loading image