लसीकरणाच्या आडून होतेय सायबर फसवणूक; कशी ते वाचा

Cyber-Crime
Cyber-Crime
Updated on

पुणे - ‘मी केंद्र सरकारच्या आरोग्य विभागातून बोलतोय... कोरोना लशीसाठी तुमची नावनोंदणी करायची आहे... त्यासाठी तुमचा आधार कार्ड क्रमांक, इतर कागदपत्रे व तुमच्या मोबाईलवर येणारा ओटीपी सांगा,’’ असा फोन, ई-मेल किंवा एखादा मेसेज तुम्हाला आला, तर त्याला प्रतिसाद देऊ नका. कारण, सायबर गुन्हेगारांकडून तुम्हाला लक्ष्य करून फसवणूक सुरू आहे. शहरात असे प्रकार घडून फसवणुका वाढल्याने अशा प्रलोभनांना बळी पडू नका, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत. यापूर्वी जनधन योजना, फास्टॅग किंवा अन्य सरकारी योजनांच्या नावाखाली नागरिकांना फोन, ईमेल किंवा मेसेज पाठवून फसवणूक करण्याचे प्रकार सायबर गुन्हेगारांकडून सातत्याने सुरू होते. मात्र आता त्यांनी फसवणुकीचा फंडा बदलला आहे. ज्येष्ठ नागरिक, महिलांनो कोरोना लशीच्या नावनोंदणीच्या नावाखाली तुमची फसवणूक होऊ शकते, त्यामुळे दक्ष राहा.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या काही दिवसांत शहरात काही नागरिकांची कोरोना लशीच्या नावाखाली फसवणूक झाली आहे. काहींना आर्थिक फटकादेखील बसला आहे. मात्र नागरिकांकडून अद्याप पोलिसात तक्रार दाखल झाली नसल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले. आरोग्य विभागानेही अशा प्रकारे कुठल्याही फसवणुकीला नागरिकांनी बळी पडू नये, तसेच आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

कोरोना लशीसंदर्भात नागरिकांना फोन येत आहेत, अशी चर्चा आहे. मात्र नागरिकांची फसवणूक झाल्याबाबत आमच्याकडे अद्याप एकही तक्रार आलेली नाही. नागरिकांनी दक्षता बाळगत आपली वैयक्तिक आणि गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये.
- राजकुमार वाघचौरे, वरीष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

सायबर गुन्हेगार बॅंक, क्रेडिट कार्ड कंपनीतून बोलत असल्याचे सांगून फसवणूक करत होते. आता तर सरकारी कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून कोरोना लशीसाठी नागरिकांच्या नावांची नोंदणी करण्याचा बहाणा करून फसविले जात आहे. काही जणांची आर्थिक फसवणूक झाली आहे; मात्र ते भीतीपोटी पोलिसात तक्रार दाखल करत नाहीत. 
- डॉ. दीपक शिकारपूर, संगणकतज्ज्ञ

लसीकरणाची प्रक्रिया चार टप्प्यांत होणार आहे. त्यात आरोग्य कर्मचारी, ५० वर्षे वयापुढील नागरिक व त्यानंतर सर्वसामान्यांना लस दिली जाणार आहे. त्यासंदर्भात ॲपवर नोंदणी केली जाते. अशा प्रकारे फोनद्वारे कोणतीही नोंदणी केली जात नाही, त्यामुळे नागरिकांनी आमिषांना बळी पडू नये. 
- डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका

काय घ्याल काळजी? 
1) कोणालाही बॅंक खाते, आधार कार्ड, डेबिट व क्रेडिट कार्डची माहिती देऊ नका
2) डेबिट कार्डवरील सीव्हीव्ही, ओटीपी, पिनही कोणाला सांगू नका
3) संशयास्पद व्यक्तींचे फोन घेणे शक्‍यतो टाळा
4) संशयास्पद मोबाईल क्रमांक ब्लॉक करून त्याविषयी पोलिसांना माहिती द्या
5) कोरोना तपासणी किंवा लशीसंबंधी माहितीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे संपर्क साधा

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune citizens can now suggest development projects for the PMC's 2027–28 Budget. Proposals can be submitted until August 31.
Despite a civic notice, mud from a construction site once again spread across Rajabahadur Mill Road in Pune, forcing the fire brigade to clean the stretch after vehicles skidded.
Pune Mayor Manjusha Nagpure claims the city has fewer potholes this monsoon than last year, even as road repair work continues across the city.
Land Acquisition
Marathi News Esakal
www.esakal.com