esakal | पश्चिम हवेलीत सत्तर हजार जणांचे लसीकरण पूर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

pune

पश्चिम हवेलीत सत्तर हजार जणांचे लसीकरण पूर्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

किरकटवाडी : पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत पश्चिम हवेलीतील चार आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून ६९ हजार ५२३ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून, सध्या लसीकरण मोहीम सुरळीत व वेगात सुरू असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी दिली आहे. खासगी लसीकरण केंद्रांवर सुरू असलेल्या लसीकरणाची आकडेवारी मात्र संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे.

सुरवातीला गोंधळाची स्थिती असलेल्या पश्चिम हवेलीतील खडकवासला, खानापूर, सांगरुण व खेड शिवापूर या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सुरू असलेल्या लसीकरण केंद्रांवर सध्या सकारात्मक चित्र दिसून येत आहे. कोणत्या लसीकरण केंद्रावर किती डोस व ते कोणत्या वयोगटासाठी राखीव आहेत, याची माहिती अगोदरच नागरिकांना देण्यात येत असल्याने लसीकरण केंद्रांवरील गोंधळ कमी झाला आहे.

हेही वाचा: भारतात पुन्हा विक्रमी लसीकरण; आठवड्यात दुसऱ्यांदा मारली बाजी

सद्यःस्थितीत पश्चिम हवेलीतील खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २२ हजार ३२१, खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ९ हजार ३६४, सांगरुण प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १३ हजार ५७६ व खेड शिवापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २४ हजार २६२ असे एकूण ६९ हजार ५२३ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून, लवकरच हा आकडा एक लाखाचा टप्पा पार करेल, असा विश्वास डॉ. खरात यांनी व्यक्त केला.

loading image
go to top