esakal | कामाच्या ठिकाणाजवळ कामगारांच्या लसीकरणास भोसरीमध्ये प्रारंभ

बोलून बातमी शोधा

corona vaccine
कामाच्या ठिकाणाजवळ कामगारांच्या लसीकरणास भोसरीमध्ये प्रारंभ
sakal_logo
By
मंगेश कोळपकर (mangesh.kolapkar@esakal.com)

पुणे : कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणाजवळ लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भोसरीमध्ये सुरू करण्यात आलेल्या केंद्राला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दोन दिवसांत सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांतील सुमारे 700 कामगारांचे लसीकरण करण्यात आले असून 472 कामगारांची अ‍ॅन्टिजेन चाचणी करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवडमधील कंपन्यांची संख्या मोठी आहे, हे लक्षात घेऊन मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड अ‍ॅग्रीकल्चर (एमसीसीआयए), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांच्यातर्फे या उपक्रमाला सुरवात झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने कामाच्या ठिकाणी लसीकरण करण्यास मान्यता दिली आहे. त्यानंतर चेंबरचे अध्यक्ष सुधीर मेहता, महासंचालक प्रशांत गिरबने यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्याला पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि तत्परतेने हे केंद्र सुरु केले. शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये या पद्धतीची आणखी केंद्र सुरू करण्यासाठी एमसीसीआयएचे प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा: मुळा-मुठा नदीचे व्यावसायिक क्षेत्रात रूपांतर कशासाठी ?

लसीकरण आणि चाचण्यांसाठी भोसरीमध्ये हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्या ठिकाणी 45 वर्षांवरील कामगारांचे अपॉइंटमेंटद्वारे लसीकरण होत आहे. टाटा, थॅरमॅक्स, बजाज ऑटो, अ‍ॅटलास कॉप्को, सॅन्डविक, पद्मजी मिल, गरवारे आदी कंपन्यांतील सुमारे दहा हजार कंपन्यांपर्यंत या केंद्रातील लसीकरण आणि अ‍ॅन्टिजेन चाचण्यांची माहिती पोचविण्यात आली आहे. तसेच कामगारांसाठी अ‍ॅंटिजेन चाचणीचीही सुविधा येथे उपलब्ध करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांत 472 जणांनी येथे चाचणी करून घेतली आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सीएसआर दोन दिवसांत 472 कामगारांच्या अ‍ॅन्टिजेन चाचण्या झाल्या, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सीएसआर सेलचे विजय वावरे यांनी दिली.

या केंद्रासाठी क्वालिटी सर्कल मॅनेजमेंट यांनी जागा उपलब्ध करून दिली आहे. पिंपरी चिंचवड तसेच परिसरातील ज्या कंपन्यांना कामगारांचे लसीकरण अथवा चाचणी करायची आहे, त्यांनी csr@pcmcindia.gov.in या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. कामगारांचे मोबाईल व्हॅनद्वारे लसीकरण करता येईल का, या बाबतही सध्या विचारविनिमय सुरू असून लवकरच त्या वर निर्णय होणार आहे. कामगारांची एकाच वेळी गर्दी होऊ नये म्हणून अपॉइंटमेंटद्वारेच लसीकरण करण्यात येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडला मिळाले २ टँकर ऑक्सिजन, पण तोही २ दिवस पुरेल एवढाच!

हेही वाचा: उन्हाच्या तडाख्यात वीज दरवाढीचा झटका; मोजावे लागणार जास्त पैसे

केंद्र सरकारने 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांचेच लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसारही या केंद्रामार्फत लसीकरण वाढविण्याचे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती वावरे यांनी दिली.