esakal | उन्हाच्या तडाख्यात वीज दरवाढीचा झटका; मोजावे लागणार जास्त पैसे

बोलून बातमी शोधा

वीज दरवाढ
उन्हाच्या तडाख्यात वीज दरवाढीचा झटका; मोजावे लागणार जास्त पैसे
sakal_logo
By
उमेश शेळके -@sumesh_sakal

पुणे : संचारबंदी लागू आहे, घरातच आहात. पण विजेच्या अतिवापर टाळा, कारण या महिन्यापासून वाढीव दराने वीजबिल भरावे लागणार आहे. महावितरणकडून एक एप्रिलपासून निवासी ग्राहकांच्या स्थिर आकार (फिक्स चार्जेस) सरसकट दोन रुपये, तर स्लॅबनुसार प्रतियुनिटमध्ये दरवाढ लागू केली आहे. त्यानुसार ३०१ ते ५०० युनिटपर्यंत वापर झाला, तर प्रतियुनिट ४ पैसे आणि ५०० युनिटच्यापुढे प्रतियुनिट ११ पैशांनी वाढ होणार आहे.

उत्पन्नातील तूट भरून काढण्यासाठी महावितरणकडून गेल्या वर्षी वीजदरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगापुढे सादर केला होता. त्यास आयोगाने मान्यता दिली होती. ही वाढ पाच वर्षांसाठी आयोगाकडून देण्यात आली होती. त्यानुसार दरवर्षी फेरआढावा घेऊन १ एप्रिलपासून ती लागू करण्याचे अधिकार महावितरणला मिळाले आहे. त्यानुसार गेल्या वर्षी दरवाढ लागू केल्यानंतर आता या आर्थिक वर्षासाठीचे प्रतियुनिट आणि स्थिर आकाराचे नवीन दर महावितरणकडून एक एप्रिलपासून लागू करण्यात आले आहे. हे दर विचारात घेतले, तर तीनशे युनिटच्या वर वापर असलेल्या मध्यमवर्गीयांना काही प्रमाणात झळ बसणार आहे.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडला मिळाले २ टँकर ऑक्सिजन, पण तोही २ दिवस पुरेल एवढाच!

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. तसेच खासगी अस्थापनांना ‘वर्क फॉर्म होम’ करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे निवासी विजेचा वापर वाढला आहे. परिणामी युनिटमध्ये वाढले की स्लॅब बदलतो. स्लॅब बदलला की प्रतियुनिटचा दरात बदल होतो. परिणामी वीजबिलात वाढ होते.

हे समजून घ्या

- गेल्या वर्षी २०२०मध्ये फिक्स चार्जेस १०० रुपये होते. त्यामध्ये दोन रुपयांनी वाढ करीत ते आता १०२ रुपये करण्यात आले आहे

- गेल्यावर्षी ३०१ ते ५०० युनिटच्या स्लॅबमध्ये असलेल्या ग्राहकांना प्रतियुनिटचा दर १० रुपये ३२ पैसे होता

- त्यामध्ये वाढ करून तो आता १० रुपये ३६ पैसे करण्यात आला आहे

- पाचशे युनिटच्या पुढे वापर असलेल्या वीज ग्राहकांच्या फिक्स चार्जेस १०० रुपयांवरून १०२ रुपये करण्यात आला आहे

- प्रतियुनिटचा दर ११ रुपये ७१ पैशांवरून तो ११ रुपये ८२ पैसे असा करण्यात आला आहे

- त्यामुळे या स्लॉबमधील ग्राहकांच्या प्रतियुनिटच्या दरात ११ पैशांनी वाढ होणार आहे.

हेही वाचा: लॉकडाउन होणार पण जिल्हाबंदी नाही; आरोग्यमंत्र्यांची माहिती

१००, ३०० युनिटपर्यंत लाभ

यापूर्वी या सर्व स्लॅबमधील वीजग्राहकांकडून फिक्स चार्जेस म्हणून १०० रुपये आकारण्यात येत होते. त्यामध्ये २ रुपयांनी वाढ करून ते आता १०२ रुपये करण्यात आले आहे. तर वहन चार्जेस (व्हिलींग चार्जेस) सरसकट १.४५ पैशांवरून १.३८ पैसे करण्यात आले आहे. ३०१ युनिटपेक्षा अधिक वापर असलेल्या प्रतियुनिटच्या दरात महावितरणने वाढ केली असली, तर त्या आतील वीजवापर असणाऱ्या ग्राहकांच्या प्रति युनिटच्या दरात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे एक एप्रिलपासून १०० युनिटपर्यंत वापर असलेल्या ग्राहकांच्या प्रतियुनिटच्या दरात २ पैशांनी तर ३०० युनिटच्या आतील वापर असलेल्या ग्राहकांच्या प्रतियुनिटच्या दरात जवळपास ९ पैशांनी कपात झाली आहे.

हेही वाचा: प्लाझ्मा तुटवडा रोखण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांना एफडीएचे आदेश

स्लॅब मागील वर्षीचे प्रतियुनिटचे दर (रुपयांमध्ये) एप्रिलपासून प्रतियुनिटचे दर (रुपयांमध्ये)

१ ते १०० युनिट ३.४६ ३.४४

१०१ ते ३०० युनिट ७.४३ ७.३४

३०१ ते ५०० युनिट १०.३२ १०.३६

५०० आणि त्यापुढील ११.७१ ११.८२