तळेगाव उपनगराध्यक्षपदी वैशाली दाभाडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

पदाची संधी दिल्याबद्दल समितीच्या पदाधिकाऱ्यांची आभारी आहे. सत्ता येते आणि जाते. बदल स्वीकारण्याची ताकद महत्त्वाची असून, सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहे.
- वैशाली दाभाडे, नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष

तळेगाव दाभाडे - उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीचे पडसाद उमटले. नवनिर्वाचित नगरसेवकांसह जनसेवा विकास समितीने पाठिंबा दिल्यामुळे विरोधी तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीच्या वैशाली दाभाडे एक मताच्या फरकाने विजयी झाल्या. सत्तेतील सहभागी जनसेवा विकास समितीने साथ सोडल्याने भाजपचे मताधिक्‍य घटले, त्यामुळे पराभवाची नामुष्की आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नगरपरिषदेमध्ये भाजप, जनसेवा विकास समिती व आरपीआय युतीची सत्ता होती. जनसेवा विकास समितीकडे उपनगराध्यक्षपद होते. संग्राम काकडे यांनी राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक घेण्यात आली. पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी कामकाज पाहिले. साहाय्यक म्हणून मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी काम पाहिले. या पदासाठी भाजपतर्फे शोभा भेगडे यांनी, तर तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीतर्फे वैशाली दाभाडे यांनी अर्ज दाखल केले होते. माघारीसाठी दिलेल्या वेळेत जनसेवा विकास समितीच्या गटनेत्या सुलोचना आवारे यांनी दाभाडे यांना पाठिंब्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर शहर सुधारणा समितीचे गटनेते किशोर भेगडे यांनी बिनविरोध निवडीबाबत भाजपला विनंती केली.

पुण्यात मानसी नाईकचा विनयभंग

मात्र, वेळ संपल्यानंतरही भाजपचे सभागृह नेते अमोल शेटे यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर मतदान घेण्यात आले. या वेळी दाभाडे यांना १४, तर भेगडे यांना १३ मते मिळाली. एक मताच्या फरकाने वैशाली दाभाडे विजयी झाल्याची घोषणा जगनाडे यांनी केली. दाभाडे यांच्या निवडीचे समितीच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून व फटाके वाजवून स्वागत केले. या वेळी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे, बापूसाहेब भेगडे, गणेश खांडगे, गणेश काकडे, बाळासाहेब शिंदे उपस्थित होते. त्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी सभागृह सोडले. नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा दाभाडे यांचा आमदार सुनील शेळके यांनी सत्कार केला.

विरोधी पक्षनेतेपदी गणेश काकडे
नगर परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी तळेगाव शहर सुधारणा विकास समितीचे नगरसेवक गणेश काकडे यांची निवड करण्यात आली.

उपनगराध्यक्षपदाची निवडणुकीनंतर गणेश खांडगे यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काकडे यांना निवडीचे पत्र दिले. नुकत्याच झालेल्या दोन पोटनिवडणुकांत अपक्ष निवडून आल्याने पक्षाचे बळ घटले होते. वैशाली दाभाडे विजयी झाल्या. काकडे हे माजी उपनगराध्यक्ष संग्राम काकडे यांच्याकडूनच पराभूत झाले होते. त्यानंतर ते तळेगाव सुधारणा व विकास समितीचे स्वीकृत सदस्य म्हणून निवडून आले. ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी उपनगराध्यक्ष, स्थायी समितीच्या सदस्यासह विषय समित्यांचे सभापती म्हणून काम केले आहे. राजकीय खेळी करत कधी भाजप तर कधी सुधारणा समिती यांना पाठिंबा देत राजकीय अस्तित्व टिकविण्यात जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी आतापर्यंत बाजी मारली असल्याचे या घटनांवरून स्पष्ट झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vaishali Dabhade as Talegaon Sub Vice President