तरुणाईच्या प्रेमाचा अतूट धागा जुळला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

पुणे -  "एखाद्याशी हसता-हसता तितक्‍याच हक्कानं रुसता आलं पाहिजे, समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहिजे, फक्त आपलं प्रेम समोरच्याच्या हृदयात साठवता आलं पाहिजे...'', अशा शब्दांत तरुणाईने "व्हॅलेंटाइन डे'ला आपल्या भावना व्यक्त केल्या. व्हॉट्‌सऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइट्‌समधूनही तरुणाईच्या प्रेमाचा अतूट धागा जुळला. मॉल, हॉटेल्स, महाविद्यालये अन्‌ विविध पर्यटनस्थळी मंगळवारी प्रेमाचा कट्टा बहरला होता. 

कधी अलगद; पण निखळ प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी तरुणाईने "व्हॅलेंटाइन डे'चं निमित्त साधलं. ज्येष्ठ नागरिकांनीही व्हॅलेंटाइननिमित्त शुभेच्छा दिल्या. यात गुलाबाने आघाडी मारली होती. पिवळा, गुलाबी, केशरी, लाल आणि पांढऱ्या गुलाबाने सजलेले पुष्पगुच्छ, चॉकलेट बुके, प्रिंटेड गुलाब युवतींच्या हातात दिसत होते. युवकांना घड्याळ, वॉलेट, परफ्युम आणि मोबाईल कव्हर भेट देऊन युवतींनी आपले प्रेम व्यक्त केले. 

जंगली महाराज रस्ता, कॅम्प परिसर, फर्ग्युसन रस्ता, डेक्कन, कोरेगाव पार्क यासह शनिवारवाडा, सारसबाग आणि "झेड ब्रीज'वर तरुणाईची गर्दी होती. काही जोडप्यांनी या दिवशी नोंदणी पद्धतीने लग्न करून "व्हॅलेंटाइन डे' आपल्या आयुष्यात विशेष बनवला. प्रेमाला वयासोबतच नात्याची चौकट नसते. त्यामुळे जोडप्यांच्या जोडीला ज्येष्ठ नागरिक, बहीण-भाऊ, आई-वडील आणि मित्र-मैत्रिणींनी एकमेकांबद्दलच्या प्रेमळ भावनांना मोकळी वाट करून दिली. 

सोशल नेटवर्किंगचे जग तर प्रेमाच्या संदेशांनी बहरले होते. छायाचित्रे, वॉलपेपर यांच्यासह शुभेच्छापत्र आणि एसएमएसची दुनियाही रंगली. मॉलमध्ये खरेदीबरोबरच कॅंडललाइट डिनर, लॉंग ड्राइव्हचा पर्यायही काहींनी निवडला. तसेच, काही फ्रेंड्‌स ग्रुपने "अकेले है तो क्‍या गम है' म्हणत एकमेकांबरोबर धम्माल, मज्जा अन्‌ मस्ती करत हा दिवस स्पेशल बनवला. या दिवशी काहींनी सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला. प्राची गायकवाड हिने आपल्या ग्रुपसोबत "व्हॅलेंटाइन डे' साजरा केला. मस्त बाइक रायडिंगची मज्जा लुटत या ग्रुपने हॉटेलमध्ये जेवण केले. 

चॉकलेट बुकेला मागणी 
तरुणाईने गुलाबाला पसंती दिली. विविध आकारांतील व नावीन्यपूर्ण पुष्पगुच्छांबरोबरच "चॉकलेट बुके'ला मागणी होती. 20 रुपयांपासून 15 हजार रुपयांपर्यंत पुष्पगुच्छांच्या किमती होत्या, असे एका विक्रेत्याने सांगितले.

Web Title: valentines day celebration pune