मनसेत खांदेपालट; पुणे शहराध्यक्षपदी वसंत मोरे

ब्रिजमोहन पाटील
Wednesday, 3 March 2021

मनसेला पुण्यात कोथरूड, कसबा पेठ, कात्रज, हडपसर काही प्रमाणात सिंहगड रस्त्यावर मानणारा मतदार आहे. २०१२ च्या निवडणुकीत मनसेची सुप्त लाट दिसून आली, त्यावेळी २९ नगरसेवक निवडून आल्याने शहरातील दोन नंबरचा पक्ष ठरला होता.

पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) शहरात खांदेपालट केला असून, शहराध्यक्षपदी नगरसेवक वसंत मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील संघटन मजबूत करून सध्या फक्त दोन नगरसेवक असलेल्या मनसेला आगामी महापालिका निवडणुकीत संख्या दोन अंकी संख्येत पोहेंचविण्याचे आव्हान मोरे यांच्यासमोर असणार आहे. गेल्या चार वर्षांपासून मनसेच्या अजय शिंदे हे शहराध्यक्षपद सांभाळत होते.

मनसेला पुण्यात कोथरूड, कसबा पेठ, कात्रज, हडपसर काही प्रमाणात सिंहगड रस्त्यावर मानणारा मतदार आहे. २०१२ च्या निवडणुकीत मनसेची सुप्त लाट दिसून आली, त्यावेळी २९ नगरसेवक निवडून आल्याने शहरातील दोन नंबरचा पक्ष ठरला होता. मात्र, पक्ष संघटनेतील गटबाजी, नगरसेवकांची कार्यपद्धती याचा फटका २०१७ च्या निवडणुकीत मनसेला बसला, नगरसेवकांची संख्या २९ वरून थेट २ वर आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

विधानसभा निवडणुकीत मनसेने शहरात चांगली कामगिरी केली. त्यामध्ये विशेषतः हडपसर विधानसभा मतदारसंघातून वसंत मोरे यांनी ३७ हजार मते घेऊन या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण केली होती. कोरोनाच्या काळात वसंत मोरे यांनी रुग्णालयाकडून नागरिकांची होणारी लूट, क्वारंटाइन सेंटर, चाचणी केंद्र येथील विषय चव्हाट्यावर आणले. मात्र, वसंत मोरे आक्रमकपणे मुद्दे मांडत असले तरी शहर पातळीवर पक्ष संघटना शांत असल्याचे चित्र आत्तापर्यंत दिसून आलेले आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून शहराध्यक्ष बदलण्यावर मनसेमध्ये चर्चा होती. अखेर आज (बुधवारी) मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोरे यांची नियुक्ती केली. पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणूकीला सामारे जाताना पक्ष संघटनेला सक्रिय करण्याचे आव्हान मोरे यांच्या समोर असणार आहे.

वसंत मोरे म्हणाले, ‘‘मला तीन वेळा नगरसेवक होण्याची संधी मिळाली आहे. विधानसभा व लोकसभेला चांगली कामगिरी मनसेने केली. यापुढे महापालिकेच्या सभागृहात, माझ्या प्रभागात ज्या विषयांवर आंदोलने होत होती, ती आता संपूर्ण शहरात केली जातील. कार्यकर्त्यांनी निवडणुकीची तयारी करावी यासाठी ‘होय नगरसेवक होणार’ हा कार्यक्रम राबविणार आहे. पुढील निवडणुकीत पुन्हा एकदा २९ नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जातील.’’

रास्ता पेठेत इमारतीला भीषण आग; 3 फ्लॅट्स व 2 दुकानं भस्मसात 

गेल्या चार वर्षापासून शहराच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी व्यवस्थित सांभाळली. यापुढे प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी मिळेल, असे अजय शिंदे यांनी सांगितले.
 

खेड-शिवापूर टोलनाक्याच्या बनावट पावत्या प्रकरणाबाबत मोठी बातमी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vasant More Appointed as MNS Pune city president