नव्या कलाकारांना शास्त्रीय संगीताची बैठक हवी

नीला शर्मा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

लोकसंगीतातील भक्तिपर गीते गाणाऱ्या शिंदे घराण्याच्या चौथ्या पिढीतील आदर्श शिंदे तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. ते आणि ‘जादूची पेटी’ या लोकप्रिय कार्यक्रमातून पेटीच्या सुरांशी सर्वसामान्य रसिकांचं नातं जोडणारे, ते वाढवणारे आदित्य ओक  ‘वसंतोत्सवा’त सादरीकरण करणार आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत.

लोकसंगीतातील भक्तिपर गीते गाणाऱ्या शिंदे घराण्याच्या चौथ्या पिढीतील आदर्श शिंदे तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. ते आणि ‘जादूची पेटी’ या लोकप्रिय कार्यक्रमातून पेटीच्या सुरांशी सर्वसामान्य रसिकांचं नातं जोडणारे, ते वाढवणारे आदित्य ओक  ‘वसंतोत्सवा’त सादरीकरण करणार आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत.

प्रश्‍न - तुम्ही स्वत: गायलेली हिंदी व मराठीतील भरपूर नवी गाणी गाजत असताना कार्यक्रमांमधून जुनी गाणीही आवर्जून सादर करण्यामागे काही विशेष हेतू? 
आदर्श -
 माझे पणजोबा (भगवान) आणि पणजी (सोनाबाई) भक्तिसंगीत गायचे. आजोबा (प्रल्हाद) यांचं नाव मराठी भक्तिसंगीताबरोबरच कव्वाली गाण्यासाठीही प्रसिद्ध झालं. वडील (आनंद) आणि काका (दिनकर व मिलिंद) यांच्या संस्कारांमुळे मी आणि माझे भाऊ (हर्षद व उत्कर्ष) लोकसंगीत गाऊ लागलो. नव्या ढंगाची गाणी आम्ही गात असलो, तरी वाडवडिलांची परंपरा जिवंत ठेवणं हे आनंद देणारं आहे. आज साउंड क्वालिटी व तंत्रज्ञान कमालीचं पुढारलेलं असल्याने आमच्या मागील पिढ्यांचा वारसा नव्या रूपात मांडणं हे कर्तव्य वाटतं. 

प्रश्‍न - लोकसंगीताचा वारसा जपायचा असताना शास्त्रीय संगीत तुम्ही शिकलात? 
आदर्श -
 आधी पंडित जसराजांचे शिष्य पं. अशोक कुमार यांच्याकडे आणि नंतर पं. सुरेश वाडकरांकडून मी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. 
आजोबा आणि बाबांना शास्त्रीय संगीत घेता आलं नाही. आज समाजमाध्यमांमुळे याबद्दल जाण वाढलेली आहे, तेवढी त्यांच्या काळात नव्हती. बाबांनी सांगितलं की, आम्ही हे शिकू शकलो नाही, पण तुम्ही मुलांनी याचं शिक्षण घेऊन पाया पक्का करावा. बाबा आणि काकांचा हा आग्रह आमच्या क्षमता वाढवण्यासाठी दिशा देणारा ठरला. याचा फायदा आता मला वेगवेगळ्या बाजाचं संगीत सादर करताना होतो. ‘वसंतोत्सवा’त उडत्या चालीच्या गाजलेल्या गाण्यांऐवजी वेगळीच गाणी सादर करायचा माझा प्रयत्न राहील. 

प्रश्‍न - रिॲलिटी शोंच्या भाऊगर्दीमुळे संगीताकडे आकर्षित होणाऱ्या तरुणांना काय सांगाल? 
आदर्श -
 छोट्या पडद्यावरील या कार्यक्रमांमुळे एका रात्रीतून कलाकार महाराष्ट्रभर पोचतात, ही या माध्यमाची फार मोठी ताकद आहे. मात्र, कुणी तरी आधीच गायलेली गाणी आपल्या आवाजात बसवून सादर करणं, याच्यापुढे जाता आलं पाहिजे. नवी गाणी स्वत:च्या आवाजात परिणामकारक करण्यात खरा कस लागतो. कित्येक कलाकार रिॲलिटी शोमधून लोकांपुढे आले आणि नंतर कुठे गेले ते कळलंच नाही. काही काळ त्यांना कार्यक्रम मिळतातही, पण पुढे स्वत:च्या ताकदीवरच जागा निर्माण करावी लागते. त्यासाठी शास्त्रीय संगीताची बैठक हवी. मेहनत आणि विचारांची परिपक्वताही हवी.

पास नसलेल्यांसाठी विशेष व्यवस्था 
‘वसंतोत्सवा’च्या सर्व प्रवेशिका काही तासांमध्येच संपल्याने १८ ते २० जानेवारी या काळात कर्वेनगर येथील पंडित फार्म्स येथे होणाऱ्या या महोत्सवासाठी खास लोकाग्रहास्तव भारतीय बैठकीची व्यवस्था केली आहे. त्यामुळे पास न मिळालेल्या रसिकांनाही या महोत्सवाचा आनंद घेता येता येणार आहे. 

Web Title: Vasantotsav Adarsh Shinde Discussion