घरोघरी पसरावा पेटीच्या जादुई स्वरांचा आनंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

प्रश्‍न - ‘जादूची पेटी’ या अभिनव कार्यक्रमाची कल्पना कशी सुचली? 

प्रश्‍न - ‘जादूची पेटी’ या अभिनव कार्यक्रमाची कल्पना कशी सुचली? 
आदित्य -
 माझे वडील पं. विद्याधर ओक यांनी प्रा. विलास पाटणकरांनी सुचविल्याप्रमाणे १९८८ मध्ये पेटीवादनाच्या रसास्वादाचा कार्यक्रम सुरू केला होता. मी बाबांच्या मागे बसून साथ करायचो. दहा-बारा वर्षांपासून मी स्वतः व्यावसायिक पातळीवर पेटीवादन करू लागल्यावर लक्षात आलं, की या वाद्याची बहुमुखी असण्याची क्षमता अजून लोकांना कळलेली नाही. शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, भक्तिसंगीत किंवा चित्रपट संगीतातही परोपरीने वाजवलं जाणारं हे वाद्य किती प्रगल्भ आहे. एकलवादन असो की साथ करणं, हे वाद्य कमाल करणारं असूनही दुर्लक्षित आहे. 

या वाद्याबद्दल सर्वसामान्य रसिकांची जाण वाढावी म्हणून मी सत्यजित प्रभू या मित्राबरोबर हा कार्यक्रम करू लागलो. बाबांच्या छोटेखानी कार्यक्रमाचा आम्ही विस्तार करत चक्क अडीच तासांचं सादरीकरण करतो. 
सत्यजित पेटीप्रमाणेच सिंथेसायझरही उत्तम वाजवतो. त्याच्या साथीने शास्त्रीय ते चित्रपट संगीतापर्यंत निरनिराळे बाज मी सादर करतो. या कार्यक्रमात पेटीचा इतिहास, तिची उत्क्रांती, वादनाचे प्रकार, ती कशी वाजवतात, कुणी शिकावी, तिच्यातून इतर वाद्यांप्रमाणे ध्वनी कसे उमटू शकतात, शब्द ऐकल्यासारखे वाटण्यासाठी कशी मेहनत घ्यावी यांसारख्या अनेक गोष्टी रंजकपणे उलगडण्याचा प्रयत्न असतो. ‘वसंतोत्सवा’त आम्ही सादर करू तो प्रयोग ११३ वा असेल. 

प्रश्‍न - रिॲलिटी शोजमुळे गाण्याकडे तरुण, शाळकरी मुलंही वळताना दिसतात. त्यांच्यात पेटीवादनाचं आकर्षण कसं निर्माण येईल? 
आदित्य -
 त्यासाठी उत्कट इच्छा, ऊर्जा असावी लागते. कदाचित असंही असेल की, यातून व्यावसायिक पातळीवर छानपणे जगता येईल का, अशी शंकाही लोकांच्या मनात असावी. पेटीच फक्त नाही तर आणखीही काही वाद्यांबाबत असं चित्र असू शकतं. सध्याची जीवनशैली पाहता पेटीवादनात करिअर करू पाहणाऱ्यांनी शिकवण्या, एकलवादन व साथीचे कार्यक्रम तसंच इतर व्यवसायाची जोड दिली तर चांगली जीवनशैली साध्य होईल. मी स्वत: अशा सर्व प्रयत्नांबरोबर जादूची पेटीसारख्या कार्यक्रमातून आगळेवेगळेपण जोपासल्यामुळे यशस्वी झालो. शिवाय, साउंड इंजिनिअर म्हणून व्यवसायही करतो. यामुळेच वसंतोत्सवाशी गेली १२ वर्षे मी जोडला गेलो आहे. राहुल देशपांडेने गेल्या महिन्यात नाशिकमधील वसंतोत्सवात आमचा हा कार्यक्रम आयोजित केला. तिथल्या तुडुंब प्रतिसादामुळे त्याने इथंही आमंत्रित केलं आहे. 

प्रश्‍न - तरुणांना काय सांगाल? 
आदित्य -
 पेटीची जादू घराघरांत पसरावी. आनंद निर्माण करणारी ठरावी. अनेक घरांमध्ये जुन्या पिढीने वाजवलेली पेटी पेटीत बंद करून ठेवलेली आहे. ती बाहेर काढावी. निरनिराळ्या मालिका पाहणं किंवा समाज माध्यमांमध्ये गुंतून वेळ वाया घालविण्यापेक्षा रोज निदान दोन गाणी पेटीवर वाजवण्याची मौज घेऊन पाहावी. यातला निखळ आनंद सकारात्मकतेचं, रचनात्मकतेचं वातावरण निर्माण करणारा ठरेल.

Web Title: Vasantotsav Aditya Oak Discussion