बंदिशींचे प्रकटले लोभस इंद्रधनुष्य

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

पुणे - एकापाठोपाठ एक बंदिशींचा खजिना पंडित शौनक अभिषेकी खुला करीत होते. ‘पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या बंदिशी’ या विषयावरील गायन कार्यशाळेत ते बंदिशींची खासीयत सांगत होते.

स्वतः गाता-गाता मध्येच थांबून समोर बसलेल्यांना गायला लावत होते. आपले पिता व गुरू अभिषेकीबुवा यांच्या बंदिशींमधील व्याकरण व सौंदर्यस्थळे उत्कटतेने सांगत होते. 

पुणे - एकापाठोपाठ एक बंदिशींचा खजिना पंडित शौनक अभिषेकी खुला करीत होते. ‘पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या बंदिशी’ या विषयावरील गायन कार्यशाळेत ते बंदिशींची खासीयत सांगत होते.

स्वतः गाता-गाता मध्येच थांबून समोर बसलेल्यांना गायला लावत होते. आपले पिता व गुरू अभिषेकीबुवा यांच्या बंदिशींमधील व्याकरण व सौंदर्यस्थळे उत्कटतेने सांगत होते. 

वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानतर्फे हिराबागेतील ज्योत्स्ना भोळे सभागृहात गुरुवारी झालेल्या या कार्यशाळेत आनंदाचा नवा ठेवा गवसल्याची अनुभूती विद्यार्थी, कलावंत व रसिकांना येत होती. निरनिराळ्या रागांमधील बंदिशींची वैशिष्ट्ये लक्षात आल्यामुळे त्या गाताना वेगळाच आनंद जाणवल्याची भावना सामूहिक स्वरांत गाणाऱ्यांची होती. जगन्नाथबुवा पुरोहित, बडे गुलाम अली खाँ,  बबनराव हळदणकर, अजमत हुसैन खाँ, रामाश्रय झा, गुलुभाई जसदनवाला, लक्ष्मणप्रसादजी आदी दिग्गजांच्या बंदिशींमधील भावछटांचे इंद्रधनुष्य मोहवत होते. 

शौनक म्हणाले, ‘‘बाबा रागाला कॅनव्हास मानायचे. ते म्हणायचे, की तो राग कसा रंगवायचा हे गायकाच्या ताकदीवर असते. त्यांनी रचलेल्या बंदिशींतून स्वर व भाषा या दोन्हींवरील त्यांचे प्रभुत्व जाणवते. कुठेही चांगली बंदीश ऐकली, तर ती आपल्या संग्रहासाठी ते विनासंकोच घेत. आम्हा शिष्यांकडून त्यांनी बंदिशी घोटून घेतल्यामुळे त्या पाठ झाल्या. त्यांनी झपतालात अनेक बंदिशी बांधल्या. नावीन्यपूर्ण जागी सुरवात व सम हे प्रयोग त्यांनी केले व त्याचा प्रभाव आगळावेगळा झाला.’’  

लंगरवा छाँड मोरी बैंया, दरसबिन सूनो लागे देस, करम करो मोपे सैंया, काहे हो हमसंग करत रार, भवानी दयानी जननी अशा बंदिशीच्या रेशीमलडी कार्यशाळेत उलगडत होत्या. मधुरंजनी, दिन की पूरिया, जौनपुरी, अडाणा, तोडी, धानी, शुद्ध सारंग, भैरव भटियार आदी रागांमधील अप्रतीम काव्य असलेल्या बंदिशींचा घोष अविरत होत होता. याला धनंजय खरवंडीकर (तबला), उदय कुलकर्णी (हार्मोनियम) यांनी साथ दिली, तर डॉ. चैतन्य कुंटे यांनी संवादकाची भूमिका बजावली. 

राहुल देशपांडेंनीही विनम्रतेने गिरवले धडे
वसंतोत्सवाचे आयोजक व तरुणांचे लाडके गायक राहुल देशपांडे या कार्यशाळेत विद्यार्थी व रसिकांमध्ये बसून स्वतः विद्यार्थ्याच्या भूमिकेतून मोबाइलमध्ये बंदिशी रेकॉर्ड करीत होते, तसेच लिहीत होते. शौनक यांच्या पाठोपाठ समूहाच्या स्वरांत स्वर मिसळून गातानाही ते रंगून गेले. 

Web Title: Vasantotsav Shaunak Abhisheki