वसुबारस साजरी; दीपोत्सवाला उत्साहात सुरूवात 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 November 2020

ज्या ठिकाणी गाय-वासरू उपलब्ध आहे, त्यांनी त्यांचे पूजन केले. गोमातेच्या पायावर पाणी आणि हार फुलांनी पूजा केली. काही ठिकाणी सवत्स धेनू नाही, त्यांनी मातीच्या बनविलेल्या प्रतिकृतीचे मनोभावे पूजन केले. 

पुणे -: चैतन्याचा बहर घेऊन आलेल्या दीपोत्सवास सुरवात झाली. गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस आज घराघरांत साजरी झाली. अंगणी सडा, त्यावर रंगीबेरंगी रांगोळ्या अन्‌ भोवती पणत्याचा झगमगाट, वैविध्यपूर्ण आकाश कंदिलांचा रंगीत प्रकाश सर्वत्र दाटला. सायंकाळी गाय-वासरांचे मनोभावे पूजनही करण्यात आले. 

कोरोनाचा मळभ दूर सारत आज प्रत्येक घरात पणतीच्या दिव्याने चैतन्य आणले. पणतीच्या तेजाने निराशेचा काळोख दूर झाला. आनंदाला भरते आले. दुपारपासून या उत्सवाची तयारी घरोघरी सुरू झाली. घरासमोरील मोकळ्या जागेत रांगोळ्या काढण्यात आल्या. संध्याकाळी देवघरातील समया तेवल्या आणि घरभर चैतन्य बहरले. नवीन कपड्यांचे रंगही त्यात मिसळले. हिंदू धर्मात गाईला महत्त्व आहे, तिच्या प्रती आदर म्हणून सवत्स धेनूची पूजा केली जाते. ज्या ठिकाणी गाय-वासरू उपलब्ध आहे, त्यांनी त्यांचे पूजन केले. गोमातेच्या पायावर पाणी आणि हार फुलांनी पूजा केली. काही ठिकाणी सवत्स धेनू नाही, त्यांनी मातीच्या बनविलेल्या प्रतिकृतीचे मनोभावे पूजन केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रत्येक घरातील खिडक्‍या, बाल्कनीमध्ये तेवणाऱ्या पणत्यांमधील दीपज्योती, आकर्षक विद्युत रोषणाई आणि दिवाळी सणाची ओळख असलेले विविध आकारांचे आकाश कंदीलही लक्ष वेधून घेत होते. पुण्यातील कपडे बाजारपेठेतही आज खरेदीसाठी गर्दी होती. त्यामुळे रस्तेही वाहनांनी भरले होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिक आणि व्यापारी काळजी घेताना दिसत होते. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vasubaras celebration; Dipotsav begins in excitement