esakal | पुणे, सातारा, सोलापूरसाठी गुड न्यूज, वीर धरण भरले
sakal

बोलून बातमी शोधा

VIR DAM

मागील पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे नीरा नदीच्या खोऱ्यातील चार धरणे सरासरी ७२ टक्के (३४.९३ टीएमसी) भरली आहेत. महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांसाठी अमृतसाठा ठरणारे वीर धरण ९४.२६ टक्के भरले असून,

पुणे, सातारा, सोलापूरसाठी गुड न्यूज, वीर धरण भरले

sakal_logo
By
संतोष शेंडकर

सोमेश्वरनगर (पुणे) : मागील पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे नीरा नदीच्या खोऱ्यातील चार धरणे सरासरी ७२ टक्के (३४.९३ टीएमसी) भरली आहेत. महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांसाठी अमृतसाठा ठरणारे वीर धरण ९४.२६ टक्के भरले असून, नीरा डावा व उजवा कालव्यावरील शेतकऱ्यांसाठी ही गुड न्यूज ठरणार आहे. आज दुपारी चारपासून वीर धरणातून ८०० क्युसेकने नीरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नीरा नदीच्या खोऱ्यातील नीरा देवघर, भाटघर, गुंजवणी, वीर या धरणांच्या प्रभावक्षेत्रात ७ ऑगस्टपर्यंत समाधानकारक पाऊस झाला. त्यानंतर पावसात घट झाली असली, तरी झालेल्या पावसाचे पाणी अजूनही धरणांमध्ये येत आहे. त्यामुळे भाटघर धरण ६९.३० टक्के, नीरा देवघर धरण ५६.३१ टक्के, तर गुंजवणी धरण ८६.११ टक्के भरले आहे. वीर धरण जवळजवळ पूर्ण म्हणजे ९४.२६ टक्के इतके आज भरले आहे. चारही धरणे सरासरी ७२.२८ टक्के इतकी भरली असून, ३४.९३ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मागील वर्षी चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरली होती. यावर्षीपेक्षा पावसाचे प्रमाणही दुप्पट होते आणि ४७ टीएमसी इतका पाणीसाठा होता. 

देशाचा जलखजिना आता एकाच क्लिक वर

यावर्षी पावसाअभावी धरण भरण्यास उशीर होत असल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी हवालदील झाला होता. वीर धरणावरील नीरा डावा व नीरा उजवा या कालव्यांवर खंडाळा, पुरंदर, फलटण, माळशिरस, बारामती, पुरंदर, इंदापूर तालुक्यातील शेती अवलंबून आहे. सध्या दोन्ही कालव्यांतून विसर्ग बंद आहे. या तालुक्यांमध्ये पाऊस होत होता, पण तरीही शेतकऱ्यांचे डोळे धरणाकडे लागले होते. मात्र, आता धरणे भरू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान पसरू लागले आहे. आज पुन्हा काही प्रमाणात पाऊस सुरू झाल्याने सर्व धरणे भरण्याकडे हळूहळू वाटचाल सुरू आहे.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी विजय नलावडे म्हणाले की, सध्या पावसाचा जोर ओसरला आहे. तरीही वीर धरणात ५००० क्युसेक्स प्रतिसेकंद वेगाने पाणी जमा होत आहे. धरण भरल्याने ८०० क्युसेक्स प्रतिसेकंद वेगाने नीरा नदीत विसर्ग केला जात आहे. पावसाचे प्रमाण वाढले तर विसर्ग वाढू शकतो.