वाहनांच्या काचा फोडल्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

बिबवेवाडी - अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाबाहेर रस्त्यावर पार्किंग केलेल्या चारचाकी वाहनाच्या काचा मद्यपींनी रविवारी रात्री फोडल्या. यामुळे परिसरात काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता.

बिबवेवाडी - अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाबाहेर रस्त्यावर पार्किंग केलेल्या चारचाकी वाहनाच्या काचा मद्यपींनी रविवारी रात्री फोडल्या. यामुळे परिसरात काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता.

नाट्यगृहात जाण्यासाठी तीन प्रवेशद्वार असून, टेरेसवर जाण्यासाठी असलेल्या तीन जिन्यांना कोठेही दरवाजा नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी टेरेसवर मद्यपी मद्यपान करत बसतात. टेरेसवर बाटल्यांचा खच पडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास नाट्यगृहाच्या टेरेसवरून खाली उभ्या असलेल्या चारचाकी वाहनावर मद्याच्या बाटल्या फेकण्यात आल्या. त्यामुळे त्यांच्या काचा फुटल्या. त्या वेळी या ठिकाणी कोणही नसल्याने कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. या बाटल्या कोणी फेकल्या, हे अद्याप समजले नाही. सुरक्षा कर्मचारी या वेळी उपस्थित असूनदेखील हा प्रकार घडल्याने नागरिकांकडून आश्‍चर्य व्यक्त होत आहे. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली नाही.

...तर सुरक्षा कर्मचाऱ्यांवर कारवाई 
नाट्यगृहाच्या सुरक्षिततेसाठी दहा सुरक्षारक्षक आहेत. त्यात तीन महिला कर्मचारी आहेत. त्यांना तीन शिफ्टमध्ये नाट्यगृहाची सुरक्षा करावी लागते. कर्मचाऱ्यांची संख्या पाहता नाट्यगृहासाठी आणखी सुरक्षारक्षकांची गरज आहे. नाट्यगृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले असून, रात्रीच्या वेळी टेरेसवर कोण गेले होते, कोणी बाटल्या फेकल्या याचा तपास सुरू आहे. सेवा बजाविण्यात कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे नाट्यगृहाचे व्यवस्थापक 
अनिल भोसले यांनी सांगितले. 

Web Title: vehicle glass damage crime