फास्टॅग वाहनांसाठी वेगळी मार्गिका (लेन) नसल्याने वाहनांच्या रांगा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

सहापदरीकरणानंतर नवीन टोल नाका 
वाहनांची वाढती संख्या पाहता पुणे-नाशिक महामार्गाचे सहापदरीकरण  करणे अत्यंत गरजेचे आहे. सहापदरीकरणाचे काम मंजूर असून, ते झाल्यावर नवीन टोल नाका होणार आहे. त्या वेळी फास्टॅग वाहनांसाठी वेगळी मार्गिका ठेवली  जाणार आहे.  तशीही सध्या असलेल्या टोल नाक्‍याची मुदत पुढच्या वर्षी संपणार आहे. त्यामुळे सध्याच्या रस्त्यावर वर्ष-दीड वर्षच टोल भरावा लागणार आहे.

राजगुरुनगर - पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर (चांडोली) टोल नाक्‍यावर फास्टॅग वाहनांसाठी वेगळी मार्गिका (लेन) नसल्याने फास्टॅग यंत्रणेचा परिणाम दिसत नाही. लांब पल्ल्याची व्यावसायिक वाहने सोडली, तर अनेक वाहनधारकांनी अद्याप फास्टॅग खाते उघडले नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे जुन्याच पद्धतीने टोलवसुली चालू असून, वाहनांच्या रांगा जवळपास तशाच आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

येथे फास्टॅगचे फलक लागले आहेत. पण, फास्टॅग वाहनांसाठी वेगळी मार्गिका नाही. त्यामुळे फास्टॅगधारकांना वेळेचा वेगळा फायदा मिळत नाही. या टोल नाक्‍यावर स्थानिक वाहनचालकांकडून टोल घेतला जात नाही. त्यामुळे त्यांनी फास्टॅग काढण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही. परिसरातील वाहनांची संख्या मोठी असल्याने या ठिकाणी वेगळी फास्टॅग मार्गिका ठेवणे अवघडच आहे. ज्या वाहनांना फास्टॅग स्टिकर आहे, ती सर्व वाहने ‘फास्टॅग’ यंत्रणेद्वारे ओळखली जात नाहीत. अशावेळी फास्टॅग ईटीसी गन वापरून खात्री करावी लागते. त्यामुळे अनेकदा वेळ वाचण्याऐवजी वेळ वाया जातो. शिवाय, टोलवरच्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत होते. असे वाहन थांबून राहिल्याने मागे लगेच रांग वाढायला सुरुवात होते. अनेकदा वाहनधारकाच्या फास्टॅग खात्यात बॅलन्स नसतो. पण, तो ते मान्य न करता टोल कर्मचाऱ्यांना त्रास देऊन टोल वाचविण्याचा प्रयत्न करतो, असे येथील कर्मचारी सांगतात.

बेरोजगारांसाठी खुशखबर! पुण्यात मिळणार रोजगाराची संधी

या टोल नाक्‍यावरून सरासरी ५०० वाहने ‘फास्टॅग’ धारक जात आहेत, तर दोन हजारांच्या आसपास इतर वाहने जात आहेत. वाहनांना येण्यासाठी तीन आणि जाण्यासाठी तीन, अशा सहा लेन आहेत. त्यामुळे फास्टॅग वाहनांसाठी वेगळी मार्गिका ठेवणे शक्‍य होत नाही.  
- विजय यादव, उपव्यवस्थापक, आयआरबी टोल नाका, चांडोली, ता. खेड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vehicle line as there is no separate lane for fastag vehicles