पोलिसांची नजर आता आरशांवर; कारवाईमुळे दुचाकीधारक हैराण

RTO-Police
RTO-Police

पुणे - दुचाकीला दोन आरसे नसल्यास दोनशे रुपये दंड वसूल करण्याची कारवाई वाहतूक पोलिसांनी सुरू केल्यामुळे दुचाकीचालक मेटाकुटीला आले आहेत. आरसे चोरीला गेल्यावर पोलिस गुन्हा दाखल करीत नाहीत; मात्र आरसा नसल्यास दंड करतात, या कात्रीत दुचाकीचालक सापडले आहेत. शहरात गेल्या ४० दिवसांत तब्बल २२ हजारांहून अधिक पुणेकरांना त्यांच्या दुचाकीला आरसा नसल्यामुळे पोलिसांकडे दंड भरावा लागला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

शहरात पोलिसांकडून पहिल्यांदाच अशा प्रकारची कारवाई सुरू झाली आहे. ‘वरून’ आदेश आल्यामुळे ही कारवाई सुरू झाल्याचे कनिष्ठ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. शहरात दुचाकी वाहनांची संख्या तब्बल ३१ लाखांहून अधिक आहे. शहराच्या मध्यभागात दुचाकी वाहनांसाठी पुरेसे पार्किंग नाही. त्यामुळे दुचाकी वाहने उभी करताना त्यांचे आरसे तुटतात. त्याचप्रमाणे उपद्रवी घटकांकडून आरसे चोरले जातात. मात्र, त्याबद्दल पोलिस चोरट्यांवर गुन्हे दाखल करीत नाहीत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. 

चालकाच्या सुरक्षिततेसाठीच
वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी, आरशांबाबत २५ डिसेंबरपासून कारवाई सुरू झाली असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘गेल्यावर्षी १४३ अपघाती मृत्यू झाले आहेत. त्यातील ७७ जण दुचाकीवर होते. त्यामध्ये ४६ दुचाकी वाहनांना दुसऱ्या वाहनाने पाठीमागून ठोस दिली. त्यात दुचाकीवरील व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. जर दुचाचाकीला आरसा असता आणि वाहनचालकाने त्याचा वापर 

केला असता तर, कदाचित अपघात झाला नसता. मोटार वाहन कायद्यातही दुचाकीला दोन आरसे असले पाहिजे, अशी तरतूद आहे. वाहन चालविण्याचा परवाना घेताना सर्व नियम पाळण्याची ग्वाही वाहनचालकाने दिलेली असते. त्यामुळे दुचाकीला आरसे आवश्यक आहेत. चालकांच्या सुरक्षिततेसाठी या नियमाची अंमलबजावणी सुरू आहे.’’

अशीही काटेकोर अंमलबजावणी 
दुचाकी वाहनचालकाला आरसा नसल्यावर थांबवल्यावर त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, विमा पॉलिसी, नोंदणी प्रमाणपत्र (आरसीटीसी कार्ड) यांची मागणी केली जाते. संबंधित कागदपत्रे नसल्यास दंडाची रक्कम दोन हजारांपेक्षा जास्त होते. वाहनचालकाने गयावया केल्यावर थोडा फार दंड घेऊन त्याला सोडले जाते, असा अनुभवही काही वाहनचालकांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला. 

दंड वसूल करण्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना वरिष्ठांनी ‘टार्गेट’ दिले की असे प्रकार सुरू होतात. अनेक प्रकारच्या नियमांचे उल्लंघन होत असताना, दुचाकीचालकांनाच प्रत्येक वेळी वेठीस का धरायचे? या प्रकाराबद्दल मुख्यमंत्री, गृहमंत्री, केंद्रीय वाहतूक मंत्र्यांना नागरिकांनी पत्रे पाठवून आपला निषेध व्यक्त केला पाहिजे. १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होत आहेत, युवकांना जाच न करता पोलिसांनी समजुतीने घेतले पाहिजे, असे मला वाटते. 
 - विजय कुंभार, माहिती अधिकार कार्यकर्ते

यावर कारवाई केव्हा ?
खासगी प्रवासी बस शहराच्या मध्य भागात येऊन प्रवासी गोळा करतात 
मालवाहतुकीच्या वाहनांना संरक्षक जाळ्या नसतात
विविध उपनगरांत रिक्षांतून होणारी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक 
लक्ष्मी रस्ता, महात्मा गांधी रस्त्यासह अनेक रस्त्यांवरील ‘डबल पार्किंग’
वर्दळीच्या चौकांतही असलेले अनधिकृत हातगाडीवाले, फेरीवाले 

दुचाकीला आरसा नसल्यामुळे पोलिसांनी मला एका महिन्यात दोन वेळा दंड केला. आरसा बसविला तरी, तो चोरीला जातो, असा अनुभव आहे. आता कसे करायचे? कोणतेही निमित्त काढून पोलिस कारवाई करीत असल्यामुळे आता दुचाकी चालविण्याचीच भीती वाटू लागली आहे. 
- विराज तावरे, दुचाकीचालक

लक्ष्मी रस्त्यावर आमच्या दुचाकीचा आरसा चोरीला गेला. मंडई पोलिसांकडे तक्रार केल्यावर त्यांनी ती घेतली नाही. त्यानंतर आठच दिवसांत माझी मुलगी गाडी चालवीत असताना, फरासखाना पोलिस ठाण्याजवळ पोलिसांनी तिला अडवून २०० रुपये दंड केला. पोलिसांना कारवाई करण्यासाठी दुचाकीचालकच सापडतात का? 
- अनिता शिंदे, दुचाकीचालक

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com