पुण्यात अजूनही वाहने तोडफोडीच्या घटना सुरूच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

या ठिकाणी घडतात घटना 
बाणेर, कोथरूड, कर्वेनगर, वारजे, येरवडा, धायरी, मार्केट यार्ड, आंबेगाव, नऱ्हे, कात्रज, धनकवडी, औंध, पुणे स्टेशन, हडपसर, कोंढवा, खडकी, बोपोडी, वानवडी, अप्पर इंदिरानगर, फुरसुंगी, रामटेकडी, शिवाजीनगर, सिंहगड रस्ता, शनिवार पेठ, कसबा पेठ, रास्ता पेठ, सोमवार पेठ.

पुणे - पोलिसांचा धाक न उरल्यामुळे शहरात वाहनांची तोडफोड आणि जाळपोळीचे प्रकार वारंवार घडत आहे. सराईत गुन्हेगारांसह कोणीही कोणत्याही कारणावरून वाहनांचे नुकसान करून दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचा फटका गोरगरीब, कष्टकरी व नोकरदारांना बसत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत असून, त्यापासून सुटका कधी होणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. शहराच्या वाहनांची तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनांच्या तक्रारींवरून पोलिस कारवाई करतात. मात्र, काही दिवसांनी पुन्हा तोच प्रकार घडतो. परिणामी, नागरिकांमध्ये गुंडाची दहशत निर्माण होत आहे. त्याविरुद्ध आवाज उठविणाऱ्यांना गुन्हेगारांकडून त्रास दिला जातो. गुन्हेगार सर्वसामान्यांच्या वाहनांना लक्ष्य करीत आहेत. त्याचा फटका याबाबत नागरिक पोलिसांना माहिती देतात. मात्र, मोठ्या घटनांचा अपवाद वगळता छोट्या घटनांकडे पोलिस  गांभीर्याने पाहत नाहीत. यामुळे आरोपींना बळ मिळत आहे.

पुणे : सोसायटीच्या अध्यक्षाला बेदम मारहाण; व्हिडिओ पाहून बसेल धक्का !

वाहनांचे नुकसान करण्याची कारणे 
पूर्ववैमनस्य, पोलिसात दिलेली तक्रार, खुन्नस, पार्किंग, किरकोळ भांडणे, नागरिक, प्रतिस्पर्धी गट किंवा टोळक्‍यावर दहशत बसविण्यासाठी असे प्रकार केले जात आहेत. झोपडपट्टी, अपार्टमेंट्‌स, वाडे, चाळी, रुग्णालयांसह सुरक्षेची पुरेपूर काळजी घेणाऱ्या सोसायट्यांत देखील वाहनांचे नुकसान करण्याच्या घटना घडत आहेत. 

कडक कारवाईची मागणी
याप्रकरणी पोलिस आरोपींविरुद्ध १५९ कलमान्वये बेकायदेशीर जमाव जमवून शस्त्रासहित वाहनांची तोडफोड, जाळपोळ केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करतात. परंतु, काही दिवसांनी सुटल्यानंतर आरोपी पुन्हा तोच प्रकार करतात. वारजे पोलिसांनी अशा गुन्हेगारांविरुद्ध सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणण्याच्या कलमाखाली गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे या प्रकारांबाबत ठोस कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

वाहनांची तोडफोड, जाळपोळ या गुन्ह्यांची गांभीर्याने दखल घेऊन आरोपींना तत्काळ अटक केली जात आहे. तसेच, प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. मात्र, आता या घटनांसंदर्भात महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधात्मक कायद्यान्वये (एमपीडीए) गुन्हा दाखल करण्यात येईल. संवेदनशील ठिकाणे निवडून परिसरात रात्रीची गस्त वाढविण्यात येईल.  
- अशोक मोराळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा

उदरनिर्वाह कसा करायचा...
मी तळजाई वसाहतीमध्ये राहत असून, कोंढव्यातील एका बांधकाम साइटवर बिगारी म्हणून काम करतो. दररोज कामावर जाण्यासाठी मी जुनी गाडी घेतली होती. परंतु, रविवारी पहाटे गाड्यांच्या तोडफोडीमध्ये माझीही दुचाकी फोडली. आता कामावर जायचे कसे? कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा की गाडीच्या दुरुस्तीसाठी हजारो रुपये खर्च करायचे, असा सद्यःस्थिती मांडणारा प्रश्‍न एका मजुराने पोटतिडकीने उपस्थित केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vehicle vandalism continues in Pune