esakal | पुणेकरांनो, विनाकारण फिराल तर वाहने जप्त होणार; सहपोलिस आयुक्तांचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

v

शनिवारी रात्रीपासून शहरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार, नागरीकांना सायंकाळी सहा ते सकाळी सहा या वेळेत कोणत्याही सबळ कारणाशिवाय घराबाहेर पडल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. 

पुणेकरांनो, विनाकारण फिराल तर वाहने जप्त होणार; सहपोलिस आयुक्तांचा इशारा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रात्री संचारबंदी असतानाही काहीजण शहरामध्ये विनाकारण फिरत असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. अशा बेशिस्त नागरिकांविरुद्ध कडक व दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. केवळ तेवढ्यावरच न थांबता, गरज पडल्यास संबंधित व्यक्तींची वाहनेही जप्त केली जातील, असा इशारा सहपोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिला आहे.

शनिवारी रात्रीपासून शहरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार, नागरीकांना सायंकाळी सहा ते सकाळी सहा या वेळेत कोणत्याही सबळ कारणाशिवाय घराबाहेर पडल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. शनिवार व रविवार या दोन दिवसांमध्ये नागरिकांना संचारबंदीची माहिती व्हावी, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी पोलिसांकडून सहकार्याची भूमिका घेण्यात आली होती.

हेही वाचा - पुण्यात न्यायाधीशानेच घेतली 50 हजारांची लाच; जामीनावर झाली सुटका

मागील दोन दिवसात पोलिसांकडून नागरिकांना दुकाने बंद करण्यापासून ते विनाकारण न फिरण्याबाबत आवाहन केले जात होते. बाहेर फिरणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने बाहेरगावांहून आलेले प्रवासी, रुग्णालयातील रुग्णांसाठी डबा घेऊन जाणारे नातेवाईक, विमानतळ, रेल्वे स्थानकावर जाणारे व येणारे प्रवासी, तसेच डॉक्‍टरांकडे जाणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक पोलिसांना आढळून आले. वैध कारणे असलेल्यांना नाकाबंदीत चौकशी करून सोडण्यात येत होते.

डॉ. शिसवे म्हणाले, ‘‘महापालिकेने मंगळवारपासून अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकांना आता बाहेर पडण्याचे काम राहणार नाही. त्यामुळे मंगळवारपासून सायंकाळी सहापासून सकाळी सहापर्यंत कडक संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जे कारणाशिवाय घराबाहेर पडलेले आढळून येतील. त्यांच्यावर भारतीय दंडसंहिता कलम १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर गरज पडल्यास त्यांची वाहनेही जप्त केली जातील.’’

हेही वाचा - पुण्यात रेमडिसिव्हिरचा पुन्हा काळा बाजार!

''कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांची आवश्‍यकता आहे. त्यानुसार महापालिकेने आवश्‍यक त्या उपाय योजना आखल्या असून, पोलिस संचारबंदीची अंमलबजावणी करणार आहेत. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, कारवाईची वेळ आणू नये.''
- अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त.

''शहरात संचारबंदी लागू असतानाही काहीजण विनाकारण शहरात फिरत असल्याचे विविध ठिकाणच्या नाकेबंदीच्या ठिकाणी पोलिसांना आढळून आले आहे. त्यामुळे अशा १९ नागरिकांविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय दंडसंहिता कलम १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.''
- मितेश घट्टे, पोलिस उपायुक्त (विशेष शाखा)

loading image