Velhe News : वेल्हे तालुक्याचे नामकरण करून राजगड तालुका करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षात वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका असे करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला.
velhe tahsil
velhe tahsilsakal

वेल्हे, (पुणे) - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षात वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका असे करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला. या निर्णयाचे राजगड तोरणा सह पानशेत भागात सर्वपक्षीय नेत्यांसह शिवप्रेमी संघटना, मावळ्यांनी जल्लोषात स्वागत केले. नामांतरासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी यासाठी पाठपुरावा केला होता.

वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यासाठी तालुक्यातील ७० ग्रामपंचायत पैकी ५८ ग्रामपंचायतीचे सकारात्मक ठराव प्राप्त करून घेणे तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या नोव्हेंबर २०२१ च्या सर्वसाधारण सभेत राजगड नावाची शिफारस मंजूर करून घेणे व पुणे विभागीय आयुक्त म्हणून ५ मे २०२२ ला तसा प्रस्ताव सादर करून घेण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावेळी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

या निर्णयाचे स्वागत करत तालुक्यामध्ये ठिकठिकाणी छत्रपती शिवरायांच्या नावाचा गजर करत,फटाक्यांच्या आतषबाजीत,साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तोरणा पायथ्याच्या वेल्हे येथील पंचायत समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुणे जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी मावळा जवान संघटनेचे अध्यक्ष व दत्ता नलावडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) किरण राऊत, भाजपचे वेल्हे अध्यक्ष आनंद देशमाने, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) युवक अध्यक्ष संदीप खुटवड, चंद्रकांत कोकाटे, गेनबा देवगिरकर, नाना साबणे, शुभम बेलदरे, प्रकाश जेधे, रविंद्र कोकाटे, खंडू गायकवाड, रामभाऊ राजीवडे, आदी उपस्थित होते.

जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या जगातील पहिल्या हिंदवी स्वराज्य या स्वतंत्र लोकशाहीवादी राष्ट्रातील राजगड हा पहिला तालुका आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. शासनाने वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका करून छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या विश्ववंदनीय कार्याच्या स्मृतींना उजाळा दिला आहे.

दत्ता नलावडे म्हणाले, 'छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या काळापासून राजगड तालुक्याचा उल्लेख आहे. शिवरायांनी किल्ले राजगडावरून १६४८ ते १६७२ पर्यंत पंचवीस वर्षे राज्यकारभार पाहिला. राजगड जगातील स्वंतत्र राष्ट्राची पहिली राजधानी आहे. राजगडाला ज्वलंत राष्ट्रीय वारसा आहे. राजगड तालुका नामकरणाने छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या लोककल्याणकारी कार्याचा जगभरात जागर होणार आहे. अशी भावना यावेळी मावळ्या रहिवाशांनी व्यक्त केल्या.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष किरण राऊत म्हणाले, 'गेल्या अनेक वर्षापासून तालुक्यातील नामांतराचा प्रश्न प्रलंबित होता उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांनी केलेल्या पाठपुरावामुळे वेल्हे तालुक्याच्या नामांतराचा प्रश्न मार्गी लागला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com