सत्ताधारी-विरोधकांमध्ये पार्किंग धोरणावरून खडाजंगी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

पुणे : पार्किंग धोरणावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. पार्किंग धोरणाच्या अंमलबजावणीत बदल होणार असला तरी, ती पुणेकरांसाठी फसवी असल्याचे सांगत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष केले; तर केवळ राजकीय सुडापोटी चांगल्या योजनेला विरोध केला जात आहे, अशा शब्दांत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. 

सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरू होताच, पार्किंग धोरणाविरोधात घोषणाबाजी करीत शिवसेनेने आंदोलन केले. तेव्हा शिवसेना आणि मनसेच्या सदस्यांनी महापौरांच्या आसनाजवळ जाऊन त्यांना मोटारीचे (कार) मॉडेल भेट देऊन धोरणाचा निषेध केला. रात्री नऊ वाजेपर्यंत अन्य विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर पार्किंग धोरणाचा प्रस्ताव चर्चेसाठी येताच उपसूचना मांडून विरोधकांना रोखण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला. 
विरोधी पक्षनेते चेतन तुपे म्हणाले, ''हे धोरण म्हणजे कोट्यवधींचा गोंधळ असेल. ज्यामुळे ठेकेदार पुणे शहरावर दरोडा टाकणार आहेत.'' 

''पार्किंग धोरणातील तरतुदी ठेकेदारांच्या तुंबड्या भरणाऱ्या आहेत. त्यातून भाजपचे ठेकेदारांबद्दलचे प्रेम दिसून येत आहे. पुणेकरांवर अन्याय होऊ नये यासाठी लढू,'' असे अरविंद शिंदे यांनी सांगितले. 

संजय भोसले म्हणाले, ''भाजपला निवडून देण्याचे फळ म्हणजे पार्किंगच्या नावाखाली नवी वसुली आहे.'' चांगल्या योजना राबविण्याला विरोध नाही. दिशाभूल करण्याला आमचा विरोध असल्याचे वसंत मोरे म्हणाले. 

''या धोरणाअंतर्गत झोपडपट्ट्यांच्या परिसरात पार्किंग शुल्क नसावे,'' अशी मागणी सुनीता वाडेकर यांनी केली. 

डॉ. सिद्धार्थ धेंडे, दत्ता धनकवडे, प्रशांत जगताप, आबा बागूल, सुभाष जगताप, पृथ्वीराज सुतार, दीपक मानकर, विशाल तांबे, अविनाश बागवे, गोपाळ चिंतल, योगेश ससाणे, आरती कोंढरे यांचीही भाषणे झाली.

Web Title: Verbal Clashes in Pune Municipal Corporation in a debate about Parking Policy