जेष्ठ साहित्यिक मधुकर पोतदार यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 October 2020

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचे अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक मधुकर रामकृष्ण उर्फ मधू पोतदार (वय 76) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. 

पुणे - मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचे अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक मधुकर रामकृष्ण उर्फ मधू पोतदार (वय 76) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

पोतदार यांनी भारतीय स्टेट बँकेत अधिकारी पदावर काम केले. त्यांनी 2001 साली स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि उर्वरित जीवन लेखन कार्यास दिले. त्यांनी शालेय जीवनापासून लिखाणास सुरुवात केली होती. बीएमसीसी महाविद्यालयातील ‘साहित्य-साधना’ या पत्राचे दोन वर्षे संपादक म्हणूनही काम केले. साहित्यातील काव्य, कथालेखन, प्रवासवर्णन,पत्रलेखन, इतिहासासंबंधी लेखन, चरित्रे, एकांकिका, आत्मचरित्रे (शब्दांकन) आदी साहित्यप्रकार  हाताळले. 

पोतदार यांच्या प्रकाशित साहित्या ओंजळफूल (काव्यसंग्रह), देवकीनंदन गोपाला, जयप्रकाश नारायण, गीतयात्री गदिमा, इतिहासातील वेचक-वेधक, छिन्नी हातोड्याचा घाव (हे संगीतकार राम कदम यांचे आत्मकथन, 7. विनोदवृक्ष हे विनोदमूर्ती वसंत शिंदे यांचे आत्मकथन, शिक्कामोर्तब, वसंतवीणा हे संगीतकार वसंत देसाई यांचे चरित्र, कुबेर हे मास्टर अविनाश उर्फ गणपतराव मोहिते यांचे चरित्र,  मानसीचा चित्रकार तो हे संगीतकार वसंत प्रभू यांचे चरित्र, वसंत लावण्य हे संगीतकार वसंत पवार यांचे चरित्र, मराठी चित्रपट संगीतकार कोष, जनकवी पी.सावळाराम, गानगोष्टी या पुस्तकांचा समावेश आहे.

हे वाचा - पुणे जिल्ह्यात चार ग्रामीण रुग्णालयांमध्ये पोस्ट कोविड केअर सेंटर

छिन्नी हातोड्याचा घाव या चरित्रग्रंथास महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड्मय निर्मितीचा ‘धनंजय कीर पुरस्कार’, .‘कुबेर’ या चरित्रग्रंथास माहिम सार्वजनिक वाचनालयाचा  उत्कृष्ट वाड्मयाचा ‘कै.सौ.उषा दातार पुरस्कार’,  ‘वसंतलावण्य’ या चरित्रग्रंथास पाथर्डी येथील ‘जनाई प्रतिष्ठान’चा उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार,  याच चरित्रग्रथांस आजरा येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर लक्षणीय गद्यसाहित्य पुरस्कार’, ‘जनकवी पी.सावळाराम’ या चरित्रग्रंथास पुण्यातील साहित्य गौरव संस्था पुरस्कार’, मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठान, पुणे याांचा  ‘मराठी भाषारत्न पुरस्कार‘ आदी पुरस्कार त्यांना मिळाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: veteran writer madhu potdar passes away