‘तान्हाजी’च्या भव्यतेला मराठी तरुणाचा साज

संतोष शाळिग्राम
रविवार, 26 जानेवारी 2020

मराठीसाठी ‘व्हीएफएक्‍स’ वरदान!
आपल्या महाराष्ट्राचा इतिहास भव्य आहे. साहित्य प्रचंड आहे. ते पडद्यावर आणायचे, तर आर्थिकदृष्ट्या परवडणारे असेलच असे नाही. परंतु, त्यासाठी ‘व्हीएफएक्‍स’ हे तंत्रज्ञान वरदान ठरेल. कथेला भव्यता देण्याबरोबरच निर्मितीचा खर्च मर्यादित ठेवण्यास हे तंत्रज्ञान मदत करील. केवळ मराठी दिग्दर्शकांनी त्या प्रकारची ‘व्हिजन’ ठेवली पाहिजे, अशी अपेक्षा प्रसाद यांनी व्यक्त केली.

पुणे - मराठेशाहीच्या इतिहासातील अतुल्य शौर्यगाथा म्हणजे नरवीर तान्हाजी मालुसरे. त्यांच्या शौर्यावर नुकताच चित्रपट प्रदर्शित झाला. तुम्हाला हे वाचून आश्‍चर्य वाटेल, की या चित्रपटातील सर्व शूटिंग हे स्टुडिओमध्येच झाले आहे आणि या कथेला संगणकाच्या मदतीने प्रचंड भव्यता दिली आहे ती एका मराठी तरुणाने. त्यांचे नाव प्रसाद सुतार.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रसाद हे कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाडचे; पण ते मुंबईत स्थायिक झाले आहेत. त्यांनी अजय देवगण यांच्याबरोबर ‘एनवाय व्हीएफएक्‍सवाला’ ही कंपनीदेखील स्थापन केली आहे. तान्हाजी या चित्रपटासाठी ‘व्हीएफएक्‍स’चे सर्व काम प्रसाद यांनी केले आहे. या चित्रपटाविषयी ‘सकाळ’शी बोलताना ते म्हणाले, ‘‘शिवाजी महाराजांचा इतिहास एवढा मोठा आहे, की तो एक-दोन चित्रपटांत मावणार नाही. तरीही, काहीतरी ऐतिहासिक करायचे डोक्‍यात होते. त्यामुळे मी आणि ओम राऊत दोघे पाच वर्षे ‘तानाजी’ चित्रपटासाठी संशोधन आणि त्याच्या दृश्‍य परिणामांवर काम करीत होतो. नंतर अजय देवगण यांच्याबरोबर याविषयी चर्चा केली. कथा ऐकल्यानंतर ते निर्मितीसाठी लगेच तयार झाले.’

'आरटीओ'ची फसवणूक करणाऱ्या बस मालक व चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

‘चित्रपटाची कथा तयार झाल्यानंतर त्याचे सर्व शूटिंग एका स्टुडिओमध्ये केले. एकही सीन स्टुडिओबाहेरचा नाही. शूटिंग पूर्ण झाल्यानंतर आम्ही अडीचशे जण या सिनेमातील ‘व्हीएफएक्‍स’वर वर्षभर काम करीत होतो. यातून त्याला आम्ही ऐतिहासिक भव्यता दिली. ‘थ्रीडी व्हर्जन’साठीदेखील खूप काम केले असून, या चित्रपटाला लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे, हेच आमच्या कष्टाचे चीज आहे.’’

अनेक सीन संगणकावर
तानाजी चित्रपटातील काही दृश्‍यांबद्दल आश्‍चर्यकारक गोष्टी सांगताना प्रसाद म्हणाले की, चित्रपटात पन्नास सीन असे आहेत, की त्याचे शूटिंग केलेले नाही. हे सर्व सीन संगणकावर (व्हीएफक्‍स) तयार केले आहेत. सिनेमातील सुरुवातीचा सीनही संगणकावर तयार केला आहे. पण, यातील कोणत्याही सीनमधील एकही फ्रेम लोकांना खोटी वाटत नाही, हेच आमचे यश आहे, असे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: VFX Technology for Tanhaji Movie by Prasad Sutar