नाट्यसमीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

पुणे - नाटकातील सौंदर्य शोधून ते वाचकांपर्यंत पोचविणारे ज्येष्ठ नाट्य समीक्षक, मराठी रंगभूमीचे अभ्यासक डॉ. वि. भा. देशपांडे (वय 78) यांचे अल्पशा आजारपणामुळे गुरुवारी येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत सायंकाळी साडेचारला अंत्यसंस्कार करण्यात आले. 

पुणे - नाटकातील सौंदर्य शोधून ते वाचकांपर्यंत पोचविणारे ज्येष्ठ नाट्य समीक्षक, मराठी रंगभूमीचे अभ्यासक डॉ. वि. भा. देशपांडे (वय 78) यांचे अल्पशा आजारपणामुळे गुरुवारी येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत सायंकाळी साडेचारला अंत्यसंस्कार करण्यात आले. 

नाट्यवर्तुळात "विभा' या नावाने डॉ. देशपांडे यांची ओळख होती. विद्यार्थी जीवनातच ते नाटकाकडे ओढले गेले. "नूमवि'त असताना त्यांनी काही नाटकांत काम केले. त्याचवेळी "सकाळ नाट्यवाचन स्पर्धे'त भाग घेतला आणि "देवमाणूस'मधल्या भूमिकेसाठी पुरस्कारही मिळाला होता. पुढे सर परशुरामभाऊ महाविद्यालयात असताना "आशीर्वाद' या नाटकात काम केले. वेगवेगळ्या एकांकिकाही केल्या. "पीडीए' आणि "रंगायन' या संस्थांशी जवळून संबंध आला. अनेक दिग्गजांचा अभिनय अनुभवता आला. एकीकडे शिक्षण घेत असतानाच ही "नाट्यभ्रमंती' करत त्यांनी रंगभूमीचा अभ्यास करायला सुरवात केली होती. 

पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1963 पासून ते नाट्यविषयक लेखन करू लागले. त्याचवेळी "पुरुषोत्तम करंडक स्पर्धा' सुरू झाली होती. त्यात देशपांडे यांनी भाग घेतला होता. शिवाय, स्पर्धेवर समीक्षात्मक लेखनही करायला सुरवात केली होती. पदव्युत्तर पदवी घेऊन ते सांगलीतील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. पुढे 1971 मध्ये मॉडर्न महाविद्यालयात आले. "माणूस', "सोबत'मध्ये नाट्यसमीक्षा लिहू लागले. नाटक हाच विषय घेऊन पीएच.डी. संपादन केली. त्यांनी मराठीच नव्हे, तर बंगाल, कर्नाटक अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या रंगभूमीचा अभ्यास केला. या अभ्यासामुळे त्यांची 25 हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली. अनेक ग्रंथांचे संपादनही त्यांनी केले. मराठीतला पहिला नाट्यकोश त्यांनी तयार केला. नाटकांबरोबरच साहित्यक्षेत्रातही त्यांचा तितकाच रस होता. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी कारकीर्द गाजवली होती. 

निवडक ग्रंथ - आचार्य अत्रे ः प्रतिमा आणि प्रतिभा, कालचक्र ः एक अभ्यास, नटसम्राट ः एक आकलन, नाटककार खानोलकर, नाट्यभ्रमणगाथा, नाट्यरंग, नाट्यव्यक्तिरेखाटन, पौराणिक-ऐतिहासिक, नाट्यसंवाद रचनाकौशल्य, नाट्यस्पंदने, निवडक नाट्य मनोगते, मराठी नाटक पहिले शतक, मराठी रंगभूमी- स्वातंत्र्यपूर्व मराठी नाटक व स्वातंत्र्योत्तर काळ- रंगभूमीचा इतिहास (दोन खंड), माझा नाट्यलेखन-दिग्दर्शनाचा प्रवास, यक्षगान लोकनाटक, रायगडाला जेव्हा जाग येते : एक सिंहावलोकन, स्वातंत्र्योत्तर मराठी नाटक. 

महत्त्वाचे पुरस्कार ः महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, जयवंतराव टिळक गौरव निधी पुरस्कार, नाट्यगौरव पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार, पुणे व पिंपरी- चिंचवड पालिकेचा गौरव, माधव मनोहर पुरस्कार, राजा मंत्री पुरस्कार, वि. स. खांडेकर नाट्यसमीक्षक पुरस्कार. 

Web Title: vi-bha-deshpande-passes-away