esakal | VIDEO: संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या पुणेकरांची भन्नाट कारणे; ऐकून पोलिसही झाले हैराण

बोलून बातमी शोधा

VIDEO: संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या पुणेकरांची भन्नाट कारणे; ऐकून पोलिसही झाले हैराण

VIDEO: संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या पुणेकरांची भन्नाट कारणे; ऐकून पोलिसही झाले हैराण

sakal_logo
By
पांडुरंग सरोदे@spandurangSakal

पुणे : पुणेकर ओळखले जातात ते आपल्या खास स्वभाववैशिष्टे आणि पुणेरी पाट्यांमुळे. पुणेकरांच्या अशाच बेरकी स्वभावाचा थेट पोलिसांनाच अनुभव आला आहे. कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन आहे. साहजिकच नागरीकांनी घराबाहेर पडायचे नाही. तरीही काही पुणेकर हमखास बाहेर पडतात. जेव्हा पोलिसांकडून त्यांना अडविले जाते, तेव्हा पोलिसांना उत्तरे मिळतात, "दुकानामध्ये दूध परत करण्यासाठी चाललोय', "कबुतरांना दाणापाणी द्यायचा आहे, म्हणून निघालोय', त्याही पुढे जाऊन रविवार असतानाही "बॅंकेत पैसे भरण्यासाठी चाललोय, हा पहा मेसेज'. अशा मजेशीर उत्तरांमुळे पोलिसांनाही हसू आवरत नाही. पण ही गंमत स्वतःबरोबरच पोलिसांच्याही जीवावर बेतू शकते, याचे भान मात्र अजूनही येण्याची चिन्हे नाहीत, हे दुर्दैव !

हेही वाचा: पिंपळे गुरवमध्ये पन्नास खाटांचे कोविड सेंटर; आमदार जगताप यांच्या प्रयत्नाला यश

पुण्यातील नागरीक त्यांच्या खास स्वभाव, शिस्तीमुळे कायम सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठरतात. खोचक, नर्मविनोदी शैलीतील पुणेरी पाट्या वाचून तर एखाद्याला हसू आवरत नाही. असे असले तरीही पुणेकरांच्या चोखंदळपणाला कुणीही सलाम केल्याशिवाय राहात नाही. एखादा चविष्ट पदार्थ असू द्यात, नाहीतर मग एखादा चित्रपट, नाटक, कार्यक्रम. एकदा पुणेकरांनी स्विकारले, की जगात कुठेही तुम्ही सहज बाजी मारू शकता, असा अनेक मोठमोठ्या कलाकारांचा अनुभव आहे. पण आत्ता हे सगळे सांगण्याचे कारण आहे. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या पुणेकरांचा इरसालपणा.

संचारबंदीतही बाहेर फिरणाऱ्या तरुणाला अडवून पोलिस त्याला बाहेर पडण्याचे कारण विचारतात. तेव्हा "दुकानात दूध परत करण्यासाठी जात आहोत', असे त्या तरुणाने पोलिसांना उत्तर दिले. तर तर एका व्यक्तीने "कबुतरांना दाणापाणी द्यायचा आहे' असे सांगून पोलिसांपासून सुटका करुन घेण्याचा प्रयत्न केला. तर एका बहाद्दराने रविवारीदेखील बॅंक चालू असल्याचे सांगून आपण पैसे भरण्यासाठी जात आहोत, एवढेच नव्हे तर बॅंकेने त्याला पाठविलेला मेसेजही पोलिसांना दाखविण्याचा प्रयत्न केला. पोलिस रात्रं-दिवस रस्त्यांवर गस्त घालत पुणेकरांचे कोरोनापासून संरक्षण करण्याचे काम करीत असतानाही काही नागरीक मात्र फुटकळ कारणे पुढे करुन संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करीत आहेत.त्यामुळे त्यांच्यासह पोलिसांचाही जीव धोक्‍यात येऊ शकतो.

हेही वाचा: बेड मिळेना म्हणून पुण्याच्या रुग्णाने रात्रीत गाठली सांगली

'एक्‍सक्‍युज'चा तो व्हिडीओ ट्विटरवर हिट!

पोलिसांना आलेल्या अशा भन्नाट अनुभवांचा एक व्हिडीओ पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या @cppunecity या ट्विटरवर प्रसिद्ध झाला आहे. या व्हिडीओला तब्बल 500 लोकांनी रिट्‌वीट केले आहे, तर साडे तीन हजार जणांनी लाईक केले आहे. याबरोबरच एकाहून एक सरस अशा हजारो कमेंटस्‌चा पाऊसही त्यावर पडला आहे.

"कोरोनामुळे असलेल्या संचारबंदीतही काही नागरीक पोलिसांना किरकोळ कारणे सांगत घराबाहेर पडत आहेत. प्रत्येक वेळी खोटी कारणे सांगून रस्त्यावर येणे गैर आहे. त्यांचा हा बेजबाबदारपण त्यांच्यासह इतरांच्या व पोलिसांच्याही जीवाववर बेतू शकतो. हे नागरीकांनी ओळखून खबरदारी घेतली पाहीजे.''

- अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त.