पिंपरी शहरात शंभर टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

शिवसेना, कॉंग्रेसचा "राष्ट्रवादी'ला छुपा पाठिंबा; राष्ट्रवादीची मते फुटल्याचा भाजपचा दावा

शिवसेना, कॉंग्रेसचा "राष्ट्रवादी'ला छुपा पाठिंबा; राष्ट्रवादीची मते फुटल्याचा भाजपचा दावा
पिंपरी - विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघासाठी शनिवारी झालेल्या निवडणुकीत पिंपरी-चिंचवड शहरातून शंभर टक्के मतदान झाले. शहरातील 131 नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजावला; तर मनसेच्या तीन सदस्यांनी पक्षाचा व्हीप झुगारून "राष्ट्रवादी'ला मतदान केले. या निवडणुकीत शिवसेना व कॉंग्रेसने राष्ट्रवादीला छुपा पाठिंबा दिल्याने येथे एकतर्फी मतदान पाहावयास मिळाले. "राष्ट्रवादी'ची काही मते फुटल्याचा दावा भाजपने केला आहे. देहूरोड कॅंटोन्मेंटच्या बारापैकी दहा सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. एका अपक्ष उमेदवाराच्या गोंधळाचा अपवाद वगळता मतदान शांततेत झाले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारतीत मतदान केंद्र होते. सकाळी आठ वाजता मतदानाला सुरवात झाली. दुपारी दोनपर्यंत 90 टक्के; तर चारपर्यंत शंभर टक्के मतदान झाले. सकाळी "राष्ट्रवादी'चे नगरसेवक व पिंपरी-चिंचवडचे प्रचारप्रमुख विलास लांडे यांनी केंद्राजवळ; तर भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी शिक्षण मंडळ सभापती यांच्या दालनात ठाण मांडले होते. सकाळी "राष्ट्रवादी'चे उमेदवार अनिल भोसले यांनी; तर त्यापाठोपाठ अपक्ष उमेदवार यशराज पारखी आणि शेवटच्या टप्प्यात भाजप उमेदवार अशोक येनपुरे यांनी मतदान केंद्राला धावती भेट दिली.

भाजपच्या तीन नगरसेवकांनी कोणाला मतदान केले, हे स्पष्ट होत नव्हते. जळगावमध्ये भाजप उमेदवारासाठी "राष्ट्रवादी'ने माघार घेतल्याने येथे भाजप राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार, असे बोलले जात होते. मात्र, भाजपच्या तिन्ही नगरसेवकांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले. या उलट राष्ट्रवादी व कॉंग्रेसचीही मते फुटली असून, ती भाजपच्या पारड्यात गेल्याचा दावा भाजपने केला. दुसरीकडे शिवसेनेने राष्ट्रवादीला अघोषित पाठिंबा दिल्याने या नगरसेवकांनीही "राष्ट्रवादी'च्या पारड्यात कौल दिल्याचे स्पष्ट झाले. सर्वांत कोंडी झाली ती मनसेची. पक्षाने व्हीप काढूनही मनसेचे गटनेते अनंत कोऱ्हाळे, राहुल जाधव आणि मंगेश खांडेकर यांनी "राष्ट्रवादी'च्या उमेदवाराला मतदान केले. अश्‍विनी चिखले पक्षाच्या आदेशानुसार तटस्थ राहिल्या. त्यांनी मतदानप्रक्रियेत भाग घेतला नाही. अपक्ष नऊ नगरसेवकांपैकी काहींनी "राष्ट्रवादी'ला; तर काहींनी भाजपला मतदान केल्याचे दिसून आले. त्यामुळे राष्ट्रवादीची काही मते फुटलेली निवडणूक निकालावरून दिसून येईल. निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार पल्लवी घाडगे यांनी काम पाहिले.

अपक्ष उमेदवाराच्या आक्षेपामुळे गोंधळ
अपक्ष उमेदवार यशराज पारखी यांनी मतदान केंद्राला सपत्नीक भेट दिली. त्या वेळी मतदान केंद्र जेथे होते, त्या तिसऱ्या मजल्यावर सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसची पक्ष बैठक सुरू होती. त्यामुळे कक्षाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी होती. त्याला आक्षेप घेत पारखी यांनी सर्वांना तिसऱ्या मजल्यावरून हटविण्याची पोलिसांकडे मागणी केली. त्याला "राष्ट्रवादी'च्या लोकांनी विरोध केल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यात काही काळ मतदानप्रक्रिया बंद ठेवण्यात आली. शेवटी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी मतदान केंद्रावर येऊन मतदान प्रक्रिया सुरळीत केली.

Web Title: vidhan parisha election in pimpri