आघाडीचा बिमोड; युतीचा फायदा? 

मंगेश कोळपकर 
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेसमध्ये पुन्हा बिनसले तर, भाजप- शिवसेना जवळ आल्याचे चित्र आहे. या घटनांचा परिणाम महापालिका निवडणुकीवर होणार असून, त्याचे पडसाद पुण्यातही नजीकच्या काळात उमटण्याची शक्‍यता आहे. त्याचा फायदा भाजपला मिळणार का? राष्ट्रवादी आपली ताकद सिद्ध करणार का? या बद्दल उत्सुकता आहे. 

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेसमध्ये पुन्हा बिनसले तर, भाजप- शिवसेना जवळ आल्याचे चित्र आहे. या घटनांचा परिणाम महापालिका निवडणुकीवर होणार असून, त्याचे पडसाद पुण्यातही नजीकच्या काळात उमटण्याची शक्‍यता आहे. त्याचा फायदा भाजपला मिळणार का? राष्ट्रवादी आपली ताकद सिद्ध करणार का? या बद्दल उत्सुकता आहे. 

विधान परिषद निवडणुकीच्या राज्यातील सहा जागा कोणी व किती लढवायच्या, याचा तिढा अखेरपर्यंत सुटला नाही. त्यातील पुण्यातील जागाही अपवाद नव्हती. त्यामुळे पुण्यात आता तिरंगी लढत होणार आहे. तांत्रिकदृष्ट्या का होईना; पण रिंगणात असलेल्या विलास लांडे यांच्या उमेदवारीमुळे मतविभाजन होणार का? हा मुद्दाही राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यातच जळगावात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने माघार घेऊन भाजपला अप्रत्यक्ष मदत करण्याची आणि त्या बदल्यात पुण्यात उमेदवारी कायम ठेवून भाजप राष्ट्रवादीला मदत करणार, अशी चर्चा आहे.

कॉंग्रेसमध्येही प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या अनुक्रमे नांदेड, सांगली, सातारा आणि यवतमाळच्या जागांच्या निकालांबद्दल उत्सुकता आहे. सांगली, साताऱ्याच्या निकालावर पुण्यात आघाडी होईल का? याचे उत्तर अवलंबून असेल, असे कॉंग्रेसमधील एका गटाचे म्हणणे आहे. 

राष्ट्रवादीकडे पुण्यात बहुमत असले तरी, कॉंग्रेसचे संजय जगताप, भाजपचे अनिल येनपुरे हे तगडे उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील अस्वस्थता दूर करून आणि पुण्यातीलही सर्वच मते राष्ट्रवादीचे अनिल भोसले यांना मिळतील का? यावर निकाल अवलंबून असेल. इतर पक्षांची मते मिळवितानाच पक्षाची मते कायम राहावी, यासाठी पक्ष व्यूहरचना करीत असल्याचे एका नेत्याने खासगीत सांगितले. यावरून राष्ट्रवादीतही सर्व काही आलबेल आहे, असे म्हणता येणार नाही. 

विधान परिषद निवडणुकीच्या निकालाचा परिणाम साहजिकच पुणे महापालिका निवडणुकीवर होणार आहे. दोन्ही पक्षातील काही नेते अधूनमधून आघाडी करण्याची भाषा करीत आहेत. परंतु, प्रत्यक्षात पावले त्या दिशेने पडत असल्याचे वाटत नाही. त्यातच पुण्यात सत्तारूढ असलेली राष्ट्रवादी कॉंग्रेस निम्या जागाही कॉंग्रेसला देण्याच्या मन:स्थितीत नाही. कॉंग्रेसही उर्वरित 40 टक्के जागांवर समाधान माननार नाही. पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील, विश्‍वजित कदम आदी कॉंग्रेसचे नेतेही स्वबळावर निवडणूक लढवावी, यासाठी आग्रही आहेत. कॉंग्रेसचे शहरातील बळ घटल्यामुळे राष्ट्रवादीही आक्रमक झाली आहे. त्यामुळे आघाडी कशी होणार, असा प्रश्‍न कार्यकर्ते विचारत आहेत. दुसरीकडे भाजप-शिवसेनेच्या प्रदेश नेतृत्त्वाने 212 नगर परिषदा-नगरपालिकांत निवडणुकांत युती करायचा, असा धोरणात्मक निर्णय विचारपूर्वक जाहीर केला आहे. विधान परिषद निवडणुकांतही ते परस्परांच्या जवळ आल्याचे भासत आहे. युतीबाबत शहरातील नेत्यांची विधाने काळजीपूर्वक होत असल्याचे अलिकडच्या काळातील घडामोडींवरून दिसत आहे. परिणामी पुण्यात युती होण्याची शक्‍यता वाढली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. आघाडी होण्याची शक्‍यता अंधुक असल्यामुळे युतीला फायदा मिळेल, असा होरा दोन्ही बाजूच्या नेत्यांचा आहे. 

कॉंग्रेस, राष्ट्रवादीमध्ये काही प्रमाणात अंतर्विरोध आहे. दोन्ही पक्षांतील पक्षांतर्गत राजकारणाचे संदर्भ वेगवेगळे आहेत. त्यात मतैक्‍य साधणे अवघड असले तरी, अशक्‍य नाही. परंतु, दोन्ही पक्षांतील दुहीचा फायदा भाजप उचलण्यासाठी प्रयत्नशील आहे. वादग्रस्त पार्श्‍वभूमी असलेल्या काही कार्यकर्त्यांच्या प्रवेशावरून उठलेल्या चर्चेचा धुराळा खाली बसविण्यात पक्षाला यश आले आहे. विधान परिषद निवडणुकीत पुण्यातील जागेचा निकाल काही लागो; परंतु पक्षाचा संदेश आणि भूमिका मतदारांपर्यंत थेट पोचविण्यासाठी भाजपचे धुरंधर प्रयत्नशील आहेत. या निवडणुकीत मनसे आणि शिवसेनेच्या मतांनाही निर्णायक महत्त्व प्राप्त झाले आहे. दोन्ही पक्षाची सुमारे 100 हून अधिक मते कोणाच्या पारड्यात झुकणार, यावरही विजयी उमेदवाराचे गणित अवलंबून असेल. परंतु, या गणितापेक्षा महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना उत्तर काय द्यायचे, याचाही विचार करावा, अशी आग्रही भूमिका पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाकडून वरिष्ठांकडे मांडली जात आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर विधान परिषदेची निवडणूक होत असल्यामुळे प्रचाराचा, निकालाचा परिणाम स्थानिक पातळीवर होणार, यात शंका नाही. मात्र, निकाल अनपेक्षित लागला तर, राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करेपर्यंत शेवटच्या टप्प्यातही आघाडी करतील, अशी काही कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. परंतु, ही शक्‍यता धूसर असल्याचेही दोन्ही पक्षांतील प्रमुख कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. 

विधान परिषद निवडणुकीचे मतदान 19 नोव्हेंबर रोजी आहे. राष्ट्रवादीसाठी पुण्यातीलही जागा प्रतिष्ठेची आहे. पक्षाच्या उमेदवाराला शंभर टक्के मतदान व्हावे, यासाठी दोन्ही शहरे आणि जिल्हाध्यक्षांवर प्रमुख जबाबदारी आहे. दुसरीकडे भाजप आपला ठसा उमटविण्याच्या प्रयत्नात आहे. तर शिवसेना, मनसे "किंगमेकर' होणार का? याबद्दल औत्सुक्‍य आहे. परिषदेच्या पुण्यातील जागेचे उमेदवार भोसले, जगताप, येनपुरे यांचे शहर, जिल्हा व पिंपरी-चिंचचडमध्ये नातेसंबंध आणि संपर्क चांगला आहे. त्यामुळे एकतर्फी वाटणारी निवडणूक आता काही प्रमाणात चुरशीची होणार आहे. मात्र, त्याचा निकाल हा महापालिका निवडणुकीच्या समिकरणांवर परिणाम करणार असल्यामुळे कार्यकर्त्यांच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. 

Web Title: vidhan parishad election alliance to benefit