Vidhan Sabha 2019 : ‘इंदापूरला दिलेला शब्द खरा  केला’ म्हणत, हर्षवर्धन पाटलांचा उमेदवारी अर्ज

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 October 2019

भाजप नेते  हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरमधून आपले तीन उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण साळुंके यांच्याकडे दाखल केले.

इंदापूर  : काँग्रेसने वाऱ्यावर सोडले, तर राष्ट्रवादी काँग्रेसने फसविले. मात्र, आपण तालुक्‍याच्या हितासाठी विश्वव्यापी नेतृत्व असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षात आलो आहोत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी इंदापूर तालुक्‍याला पाणी देण्याचा शब्द खरा करून दाखवला आहे, त्यामुळे आता महायुतीच्या उमेदवारासविजयी करून इतिहासाचे साक्षीदार व्हा, असे आवाहन भाजप नेते आणि इंदापूरचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी केले. आज, हर्षवर्धन पाटील यांनी आपले तीन उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण साळुंके यांच्याकडे दाखल केले.

खडसे, तावडे, बावनकुळेंचे काय होणार?

राष्ट्रवादीने नेहमीप्रमाणे फसवले
हर्षवर्धन पाटील यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, काँग्रेसला राम राम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आज, भाजपकडून त्यांनी इंदापूरसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. शहरातील श्रीराम वेस येथून पदयात्रा सुरू होऊन मुख्य बाजारपेठमार्गे समारोप 100 फुटी रस्त्यावर ज्येष्ठ नागरिक संघाजवळील मैदानावर विराट जाहीर सभेत झाला. या वेळी पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार व आमदार दत्तात्रेय भरणे यांच्यावर नाव न घेता टीका केली. पाटील म्हणाले, ‘लोकसभेस आमची मदत घेतली. मात्र, विधानसभा निवडणूक आली की राष्ट्रवादीने नेहमीप्रमाणे फसविले. कॉंग्रेसनेदेखील साथ न दिल्याने जनतेच्या हितासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. आता एक सोडून शेजारचे सर्व दादा आपल्या सोबत आहेत, त्यामुळे चिंता नाही. मात्र, शेजारच्या दादाची काय अवस्था झाली आहे, तो कधी पळतोय तर कधी रडतोय. त्यामुळे आता काळजी करायची नाही. 2014च्या पराजयचा वचपा काढायचा आहे, त्यामुळे आता काठावर पास नको. विधानसभेत पहिल्या बाकावर बसण्यासाठी विक्रमी मतांनी विजयी करा.’

बच्चू कडूंचा पक्ष 50 जागा लढवणार

1300 कोटी फ्लेक्स लावण्यापूरतेच 
विरोधी पक्षाचा आमदार असूनदेखील 1300 कोटी रुपये तालुक्‍याच्या विकासासाठी आणले, असे आमदार म्हणतात. मात्र, हे पैसे फ्लेक्‍स लावण्यापुरतेच आले. नीरा, भीमा व खडकवासल्याचे पाणी न आल्यामुळे तालुक्‍याचे दरवर्षी सुमारे 2500 कोटी रुपयांचे नुकसान झाले, त्यामुळे सर्वांचा प्रपंच धोक्‍यात आला. त्यामुळे निष्क्रिय लोकप्रतिनिधीस दारी धरायला लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. शिक्षण, शेती, शेतीप्रक्रिया उद्योगास पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यास सर्वोच्च प्राधान्य देणार, अशी ग्वाही पाटील यांनी या वेळी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 bjp leader harshvardhan patil nomination indapur pune