Vidhan Sabha 2019 : पुण्यात राष्ट्रवादीच ‘बिग ब्रदर’ 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 October 2019

एकेकाळी पुण्यात बालेकिल्ला असणाऱ्या काँग्रेसला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आघाडीतील छोटा भाऊ म्हणून तीन जागांवरच समाधान मानावे लागले आहे.

विधानसभा 2019  
पुणे - एकेकाळी पुण्यात बालेकिल्ला असणाऱ्या काँग्रेसला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आघाडीतील छोटा भाऊ म्हणून तीन जागांवरच समाधान मानावे लागले आहे. लोकसभा निवडणुकीपासूनच पुण्यावर दावा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्यात एक जास्तीची जागा मिळविण्यात यश आल्याने यापुढील निवडणुकांमध्ये पुण्यात राष्ट्रवादीच ‘बिग ब्रदर’ राहणार,  हे निश्‍चित.

आठ जागांपैकी चार-चार जागा दोन्ही काँग्रेसला मिळतील, अशी अपेक्षा होती. काँग्रेसकडून या वेळी पर्वतीसाठी मोठा आग्रह धरला होता; पण शिवाजीनगर, पुणे कॅंटोन्मेंट आणि कसबा या तीनच जागा काँग्रेसकडे राहिल्या असून वडगाव शेरी, कोथरूड, खडकवासला,  पर्वती आणि हडपसर या पाच जागा राष्ट्रवादीने पटकाविल्या आहेत. त्यामुळे शहरात काँग्रेसपेक्षा आमचीच ताकद जास्त असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा खरा ठरला आहे. 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडे आलेल्या शिवाजीनगर, पुणे कॅंटोन्मेंट आणि कसबा या तीन मतदारसंघात मोहन जोशी यांना इतर पाच मतदारसंघाच्या तुलनेत चांगली मते मिळाली आहेत. त्यामुळे हे तीन मतदारसंघ काँग्रेसकडेच राहतील, यावर शिक्कामोर्तब झाले होते; पण पर्वती मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असणारे सचिन तावरे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा, अशी मागणी होती. बागूल यांनी जोरदार तयारीही केली; पण हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसने सोडला नाही. परिणामी, काँग्रेसला २००९ च्या आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार मिळालेल्या चारपैकी एक मतदारसंघ गमवावा लागला. 

२००९ मध्ये हडपसरला बाळासाहेब शिवरकर, शिवाजीनगरला विनायक निम्हण, पुणे कॅंटोन्मेंटमध्ये रमेश बागवे आणि कसबा पेठेतून रोहित टिळक यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढविली. त्यापैकी निम्हण आणि बागवे विजयी झाले. २०१४ मध्ये आघाडी झाली नसल्याने सर्व आठ जागा काँग्रेसने लढविल्या त्यात शिवाजीनगर, पुणे कॅंटोन्मेंट आणि कसबा येथे काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिला. या तीन जागाच काँग्रेसला या निवडणुकीत  मिळाल्या. 

काँग्रेस आघाडीचा जो फॉर्म्युला ठरला, त्यात २०१४ च्या निवडणुकीतील विद्यमान आमदारांच्या जागा ज्या-त्या पक्षाला, दुसऱ्या क्रमांकाच्या जागा ज्या-त्या पक्षाला दिल्या जातात. याच क्रमाने राष्ट्रवादी काँग्रेसला शहरात पाच जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी कमी जागा दिल्याने प्रचंड नाराजी व्यक्त केली. 

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेहमीच वर्चस्व राहिले होते; पण शहरातही आता पाच जागा मिळाल्याने काँग्रेसला छोट्या भावाची भूमिका घ्यावी लागणार आहे. त्याचा परिणाम पुढील महापालिका आणि लोकसभा निवडणुकीवर होणार हे नक्की. 

२०१४ च्या निवडणुकीतील पक्षाचे स्थान
 वडगाव शेरी : काँग्रेस (पाचव्या); राष्ट्रवादी (तिसऱ्या)  
 शिवाजीनगर : काँग्रेस (दुसऱ्या); राष्ट्रवादी (तिसऱ्या) 
 कोथरूड : काँग्रेस (पाचव्या); राष्ट्रवादी (तिसऱ्या) 
 खडकवासला : काँग्रेस (पाचव्या); राष्ट्रवादी (दुसऱ्या)
 पर्वती : काँग्रेस (चौथ्या); राष्ट्रवादी (पाचव्या)
 हडपसर : काँग्रेस (पाचव्या); राष्ट्रवादी (तिसऱ्या) 
 पुणे कॅंटोन्मेंट : काँग्रेस (दुसऱ्या); राष्ट्रवादी (पाचव्या) 
 कसबा : काँग्रेस (दुसऱ्या);  राष्ट्रवादी (चौथ्या)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 NCP Big Brother in Pune