Vidhan Sabha 2019 : ‘मी काय केले विचारतात, हीच गंमत’; पवारांचा अमित शहांना टोला

Vidhan Sabha 2019 ncp leader sharad pawar speech baramati statement on Amit Shah
Vidhan Sabha 2019 ncp leader sharad pawar speech baramati statement on Amit Shah

बारामती शहर : राज्याच्या निवडणुकीत दम नाही, असे मुख्यमंत्री सांगत असतील; तर नरेंद्र मोदी, अमित शहा प्रचारासाठी का येतात, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केलाय. ‘पाच वर्षांपूर्वी अमित शहा हे नावही कोणाला माहिती नव्हते आणि ते महाराष्ट्रात येऊन शरद पवारांनी काय केले? असे विचारतात, ही मोठी गंमत आहे. मी सभागृहांमध्ये जाऊन बावन्न वर्षे झाली. काही केले नसते, तर लोकांनी निवडूनच दिले नसते. यांना जाब विचारला, तर खोटे खटले भरतात. ज्यांना तुरुंगात टाकायचे, ते मला जाब विचारतात.’ असा टोला पवार यांनी लगावला. बारामती मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत शनिवारी शरद पवार बोलत होते. या वेळी खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार तसेच पवार कुटुंबीय यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

'लोकांमध्ये सरकारविषयी संताप'
पवार म्हणाले, ‘राज्यातील एकवीस जिल्ह्यांत प्रचारासाठी गेलो. परिवर्तन व्हायला पाहिजे, अशी युवा पिढीची भावना असल्याचे पाहायला मिळाले. सत्तेचा गैरवापर करणाऱ्या या सरकारला सत्तेवरून खाली खेचा. समाजातील एकही घटक राज्य सरकारच्या कामावर समाधानी नाही. शेतकरी, कामगार, कारखानदार यांसह समाजातील एकाही घटकाच्या हिताची जपणूक करण्यासाठी सत्तेचा वापर या सरकारने केलेला दिसत नाही. त्यामुळे लोकांमध्ये सरकारविषयी संताप आहे.’

‘मत मागण्याचाही अधिकार नाही’
मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करताना पवार म्हणाले, ‘मुख्यमंत्री म्हणतात की, विरोधी पक्षातील कोणीही मला दिसतच नाही. आमच्याकडे तेल लावून पहिलवान तयार आहेत. मी त्यांना नम्रपणे सांगू इच्छितो की, मी कुस्तीगीर संघाचा अध्यक्ष आहे. कुस्ती करण्यापेक्षाही तुम्ही पाच वर्षांत काय केले, याची माहिती द्या. सोळा हजारांहून अधिक शेतकरी या राज्यात आत्महत्या करतात, याची राज्यकर्त्यांना शरम वाटायला पाहिजे. शेतीमालाला भाव नाही, कर्ज काढलेले फेडता आले नाही, जप्तीच्या नोटिशीच्या तणावाने शेतकरी आत्महत्या करतात. ही परिस्थिती बदलण्याची ताकद नसलेल्या सरकारला राज्य करण्याचा व मत मागण्याचाही अधिकार नाही. आम्ही कर्जमाफीसह इतर अनेक कामे शेतकऱ्यांसाठी केली.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com