Vidhan Sabha 2019: मतदानासाठी राजकीय पक्षांची यंत्रणा सज्ज

Vidhan Sabha 2019: मतदानासाठी राजकीय पक्षांची यंत्रणा सज्ज

विधानसभा 2019 :
पुणे - विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर पावसाचे सावट असल्याने उमेदवारांची चिंता वाढली आहे. पाऊस पडतोय म्हणून मतदारांनी घरात बसून राहू नये, यासाठी जनजागृती सुरू केली आहे. शिवाय, त्यांनी मतदान केंद्रावर जावे यासाठी रिक्षा, मोटार याचीही व्यवस्था केली आहे; तर प्रत्येक मतदान केंद्रातील पोलिंग एजंटसह केंद्राबाहेरील यंत्रणा सज्ज झाली आहे. 

पुणे शहर व परिसरात शनिवारी (ता. १९) पहाटेपासून संततधार पाऊस सुरू आहे. पाऊस उसंत घेत नसल्याने भर पावसात रॅली काढत चिंब भिजून उमेदवारांना प्रचाराचा समारोप करावा लागला. आज (रविवारी) दिवसभर पावसाच्या सरी कोसळत असल्याने जनजीवन विस्कळित झाले, तरीही उमेदवारांनी गाठीभेटींवर भर देऊन, छुपा प्रचार सुरू ठेवला आहे. 

सोमवारी (ता. २१) सकाळी सातपासून मतदानाला सुरवात होत असताना हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पावसाचा परिणाम मतदानावर होण्याची शक्‍यता आहे. मतदार यादीतील घोळ, मतदान केंद्र न सापडणे यामुळे अनेक जण मतदान करण्याचे टाळतात, त्यात परत पाऊस सुरू राहिल्यास त्याचा फटका बसण्याची भीती उमेदवारांना आहे. त्यामुळे पाऊस असला तरी त्यांना एकगठ्ठा मतदान होणाऱ्या भागातून जास्तीत जास्त मतदारांनी बाहेर पडावे, यासाठी आवाहन करा. रिक्षांची व्यवस्था करा, स्वतःची मोटार वा अन्य वाहने मदतीसाठी घ्या आणि मतदारांना मतदान केंद्रावर न्या, अशी सूचना बूथप्रमुख व त्याखालील कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे. 

शहरातील आठ मतदारसंघांत २ हजार ८७२ मतदान केंद्रे आहेत. एका मतदान केंद्रासाठी भाजपने पन्नाप्रमुख, बूथप्रमुख नेमले आहेत, तर पाच बूथप्रमुखांचे एक शक्तिकेंद्र निर्माण केले आहे. ही यंत्रणा आठही मतदारसंघांत तयार आहे. प्रत्येक मतदान केंद्रात पोलिंग एजंट नेमले आहेत, तर मतदान केंद्राबाहेर लॅपटॉप घेऊन कार्यकर्ते मतदारांच्या मदतीसाठी आहेत. पन्नाप्रमुखांवर त्यांच्याकडे असलेल्या यादीतील मतदारांना बाहेर काढण्याची जबाबदारी दिली आहे. काँग्रेसने आज प्रत्येक मतदारसंघात पोलिंग एजंटच्या बैठका घेऊन, मतदान केंद्रावर कसे काम करायचे याचे प्रशिक्षण दिले आहे, तर मतदान केंद्राबाहेर काँग्रेसचे बूथ असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेनेही पक्षाची यंत्रणा उभारली आहे. तसेच, पक्षाचे पदाधिकारी घरोघरी जाऊन मतदारांना बाहेर काढणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com