esakal | Vidhan Sabha 2019:दादा हे वागणं बरं नव्हं!
sakal

बोलून बातमी शोधा

vidhan sabha 2019 sambhaji patil writes blog chandrakant patil

Vidhan Sabha 2019:दादा हे वागणं बरं नव्हं!

sakal_logo
By
संभाजी पाटील

सेनापतीने अवघड ठिकाणी लढून लढाई फत्ते करायची असते, इतर सैन्याला बळ द्यायचे असते. इथे मात्र उलटच घडले. पक्षाचा कोणताही साधा कार्यकर्ताही ज्या ठिकाणाहून विजयी झाला असता, त्या ठिकाणी भाजपच्या राज्यातील सेनापतीने अर्थात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील chandrakant patil यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. कोथरूड हा पुण्यातील भाजपचा सर्वात सुरक्षित मतदारसंघ. या मतदारसंघावर कोल्हापूरच्या दादांनी कब्जा करून स्थानिक कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याची भावना आहे. दादांनी खरे तर पक्षाला अवघड असणाऱ्या मतदारसंघात निवडणूक लढविली असती तर प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्याविषयी अभिमानच वाटला असता. पण सोपा मतदारसंघ घेऊन लढायचे याला लढणे म्हणतं नाही. त्यामुळेच "दादा हे वागणं बरं नव्हं...' अशीच प्रतिक्रिया भाजप कार्यकर्त्यांमध्ये उमटली.

भाजपच्या मेगाभरतीत दोन नेत्यांचाच प्रवेश

भाजपचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी ज्यांना मंत्रिपद हवे त्यांनी लोकांमधून निवडून यायला हवे असा फतवा काढला. त्यामुळे नेहमी मागच्या दाराने येऊन पदे मिळविणाऱ्यांची पंचाईत झाली आहे. आपलीही हीच गत होऊ नये यासाठी चंद्रकांतदादांनाही chandrakant patil निवडणूक लढवावी असा आग्रह झाला. दादा सध्या विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी आपण यापुढे निवडणूक लढविणार नसल्याचेही अनेक ठिकाणी जाहीर केले होते. पण भाजपच्या नव्या धोरणानुसार त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. खरे तर दादा हे राज्य मंत्रिमंडळातील क्रमांक दोनचे मंत्रिपद भूषवीत आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रात त्यांचा दबदबा आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेक दिग्गज त्यांनी भाजपमध्ये आणले. अशा वजनदार नेत्याने एक सुरक्षित मतदारसंघ निवडावा आणि त्या मतदारसंघातील इच्छुकांवर अन्याय करावा हे पटणारे नाही. जर तुम्हाला निवडणूक लढवायची होती, तर कोल्हापूर मधील कोणताही एक मतदारसंघ निवडता आला असता. तेथे निवडणूक लढवून दादा विजयी झाले असते, तर त्यांचा भाजपमधील दबदबा आणि स्थान आणखी उंचावले असते. पण, तसे घडले नाही.

कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील विरुद्ध चंद्रकांत मोकाटे

लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट पुण्यात विजयी झाल्यानंतर चंद्रकांतदादा हे पुण्याचे पालकमंत्री बनले. खरे तर त्याच वेळी पुण्यातील एखाद्या आमदाराला संधी दिली असती तर भाजपची ताकद आणखी वाढण्यास मदत झाली असती. पण तसे झाले नाही उलट दिलीप कांबळे यांचे राज्यमंत्रिपदही काढून घेण्यात आले. जर एखाद्या पुण्यातील आमदाराला मंत्रिपदाची संधी दिली असती तर दुसऱ्या फळीचे नेतृत्व तयार होण्यास मदत झाली असती. पण तसे झाले नाही. आता चंद्रकांतदादा chandrakant patil कोथरूडमधून उभे राहतील, विजयीही होतील. पुन्हा मंत्री होतील, पालकमंत्री होतील. पण पुण्यातील कार्यकर्त्यांची संधी गेली हे नक्की. भाजप इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देणार आहे. ते विजयी झाले तर त्यांना मंत्रिपदही दिले जाईल. म्हणजेच पुण्यात दोन्ही मंत्री हे "बाहेर'चे असतील.

कोथरूड मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत बापट यांना एक लाख मतांचे मताधिक्‍य मिळाले होते. विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचा मतदारसंघावर चांगला प्रभाव होता. त्यांचा कामाचा झपाटा मोठा होता. कुलकर्णी यांच्यासोबत नगरसेवक मुरलीधर मोहोळ हेही प्रमुख इच्छुक होते. मुख्यमंत्र्यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहोळ यांचे तिकीट यावेळी फिक्‍स असे कार्यकर्ते आवर्जून सांगत होते. दुर्दैवाने या दोघांच्या आशा-आकांक्षांवर पाणी पडले आहे. चंद्रकांत पाटील chandrakant patil हे पुण्यातून आमदार झाल्यानंतर त्याचे पडसाद पुण्याच्या राजकारणावर दीर्घकालीन पडणार आहेत. आतापर्यंत पुण्याचे नेतृत्व बापट यांच्याकडे होते. शहर-जिल्हा-पिंपरी चिंचवड या तीनही ठिकाणी बापट यांचा शब्द महत्त्वाचा मानला जात होता. पण यापुढे पालकमंत्री या नात्याने किंवा प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रकांत पाटील यांच्याकडेच पुणे जिल्ह्याची सूत्र येतील. पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस संपवावी यासाठी चंद्रकांतदादा लोकसभा निवडणुकीपासून प्रयत्नशील आहेत. बारामती हे त्यांचे पहिल्यापासून टार्गेट राहिले आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादीवर वचक ठेवण्याचे काम आता भाजपचे हे "दादा' करतील, हे नक्की!

loading image