Vidhan Sabha 2019 खेडमध्ये जो जिंकेल तो कमी मतांनी

राजेंद्र सांडभोर
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

राजगुरुनगर (पुणे) : खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात गेल्या वेळेप्रमाणेच उत्साहात मतदान झाल्याने मतदानाची सरासरी 67 टक्‍क्‍यांवर गेली आहे. चुरशीची तिरंगी लढत झाल्याने मोठ्या संख्येने झालेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार, याबाबत मतमतांतरे राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहेत. यावेळचा कोणाचाही विजय मोठ्या फरकाने होणार नाही, या मताशी सर्व राजकीय जाणकार सहमत आहेत.

राजगुरुनगर (पुणे) : खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात गेल्या वेळेप्रमाणेच उत्साहात मतदान झाल्याने मतदानाची सरासरी 67 टक्‍क्‍यांवर गेली आहे. चुरशीची तिरंगी लढत झाल्याने मोठ्या संख्येने झालेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार, याबाबत मतमतांतरे राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहेत. यावेळचा कोणाचाही विजय मोठ्या फरकाने होणार नाही, या मताशी सर्व राजकीय जाणकार सहमत आहेत.

मतदारसंघात सुरवातीच्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दिलीप मोहितेंची आघाडी दिसत होती. मराठा आरक्षण आंदोलन आणि शरद पवारांबद्दल वाढलेली सहानुभूती यामुळे त्यांना पाठिंबा मिळत होता. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्यावर राष्ट्रवादीचे मोहिते आणि शिवसेनेचे सुरेश गोरे असा सामना रंगणार असे चित्र दिसत होते. मात्र, युवकांचा पाठिंबा, भाजपचे बंडखोर उमेदवार अतुल देशमुख यांना वाढू लागला. कोणी नेता नसतानाही आळंदी आणि राजगुरुनगर येथील त्यांच्या सभा मोठ्या झाल्याने तेही स्पर्धेत आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे देशमुखांच्या पारड्यातही भरघोस मते पडल्याची चर्चा आहे. पण ही मते त्यांना विजयापर्यंत नेऊ शकणार का? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. कारण तालुक्‍याचा आजवरचा इतिहास पाहता कितीही हवा झाली, तरी प्रत्यक्ष मतदानात अपक्ष उमेदवार कमी पडतो, असे याआधी सिद्ध झाले आहे. मात्र, त्यांना पाठिंबा वाढल्याने अन्य दोघांची गणिते बिघडली. देशमुखांकडे जाणारी मते कोणाची, याबाबत मतमतांतरे आहेत. पण त्यांचा फटका बसणारा पराभूत होणार हे निश्‍चित आहे.

प्रचाराच्या आघाडीत काहीशा मागे राहिलेल्या गोरे यांनी नंतर सातत्याने प्रयत्न करून कसर भरून काढली. शेवटच्या दिवसापर्यंत हळूहळू वेग वाढवत नेऊन आपला टक्का वाढविला आणि सुरक्षित टप्पा गाठला. तो त्यांना विजयापर्यंत नेणारा ठरणार का? हे आता मतमोजणीच्या दिवशीच स्पष्ट होईल.

गेल्या वेळी मतदारसंघात 70.68 टक्के मतदान झाले होते. या वेळी 67.27 टक्के मतदान झाले. जरी तीन टक्के मतदान कमी झाले असले तरी मतदार वाढल्याने ते गेल्यावेळेपेक्षा जास्त आहे. गेल्या वेळी मतदान 2 लाख 193 होते, तर या वेळी 2 लाख 20 हजार 165 एवढे आहे. निवडणुकीतील चुरस पाहता, निवडून येणाऱ्या उमेदवारास 90 हजारांच्या आसपास मते पडण्याची गरज आहे. हा टप्पा कोण गाठतो, यावर मोहिते की, पुन्हा गोरे, की यामागचा इतिहास पुसत, अपक्ष देशमुख बाजी मारणार हे ठरणार आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha Election 2019