विधानसभेत २५० जागा मिळतील - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जून 2019

पिंपरी- चिंचवडलाही मंत्रिपद मिळेल
पुणे शहराला मंत्रिपद मिळाले असले तरी पुणे ग्रामीणला वर्षानुवर्षे मंत्रिपद मिळाले नव्हते. याबाबत कार्यकर्त्यांची मागणी होती. बाळा भेगडे यांच्या रूपाने ही मागणी पूर्ण झाली. पुढील काळात पिंपरी- चिंचवडलाही मंत्रिपद दिले जाईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पिंपरी - ‘राज्यात आगामी काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडणार आहेत. यामुळे युतीला आगामी विधानसभा निवडणुकीत २५० जागा मिळाल्यास आश्‍चर्य वाटायला नको,’’ असे विधान महसूलमंत्री व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी (ता. २५) केले.  

पालकमंत्री झाल्यानंतर पाटील हे पहिल्यांदाच पिंपरी- चिंचवड शहरात आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे महापौर राहुल जाधव, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे उपस्थित होते. 

पाटील म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीत युतीला विधानसभेच्या २२० जागांवर आघाडी मिळाली आहे. शिवसेनेसोबत युती करताना जागा आणि सत्तेत ५० टक्‍के भागीदारी देण्याचे ठरले आहे. प्रत्यक्ष चर्चेला बसल्यावर जागा मागेपुढे होण्याची शक्‍यता आहे. 

१५ ते २० ऑक्‍टोबर दरम्यान निवडणूक होईल. १५ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागण्याची शक्‍यता आहे. लोकसभा निवडणुकीत आपल्याला चांगले मताधिक्‍य मिळाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत गाफील राहू नका.’’ अजित पवार यांचा बारामती विधानसभा मतदारसंघातून पराभव होईल, असे विधान मी करणार नाही. त्यांचा पराभव करणे हे धेय्य असले तरी ते प्रत्यक्षात असू शकत नाही. हा आमचा आशावाद असू शकतो. लढवत असलेल्या सगळ्याच जागा जिंकण्यासाठी नसतात. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत बारामतीमधून भाजपचाच खासदार निवडून येईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. अजित पवार तुरुंगात जातील का, हे सांगणारा मी ज्योतिषी नाही. ते प्रकरण न्यायालयात आहे. त्यावर आपण बोलणार नसल्याचेही ते म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 250 Seats Chandrakant Patil Politics