Vidhansabha 2019 : भाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचे बिगुल

BJP-NCP
BJP-NCP

पिंपरी - आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादीने आजी-माजी नगरसेवक व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. ही बैठक गुरुवारी (ता. १८) भाजपचा सध्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळे गुरव येथील निळू फुले रंगमंदिरात होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीत मार्गदर्शन करतील.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा पराभव झाला. शहरातील चिंचवड मतदारसंघात ९६ हजार, पिंपरीत ४१ हजार, तर भोसरीत ४० हजारांचे मताधिक्‍य भाजपला मिळाले. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नैराश्‍य आले आहे. मात्र, पराभवाने नाउमेद न होता पुन्हा नव्या जोमाने राष्ट्रवादी कामाला लागला आहे. ऑक्‍टोबर महिन्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी आजी माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे.

इच्छुकांची मांदियाळी
मागील महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्यांची मुंबईत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत चिंचवड विधानसभा मतदारसंघातून नाना काटे, भाऊसाहेब भोईर, मोरेश्‍वर भोंडवे, मयूर कलाटे, प्रशांत शितोळे यांच्या नावांची चर्चा होती. तर, पिंपरी विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार अण्णा बनसोडे, शेखर ओव्हाळ, ॲड. गोरक्ष लोखंडे, सुलक्षणा शीलवंत-धर, संदीपान झोंबाडे यांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली. भोसरी विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार विलास लांडे, दत्ता साने, अजित गव्हाणे, जालिंदर शिंदे, पंडित गवळी, दत्ता जगताप इच्छुक असल्याचे समोर आले. 

युतीचे संकेत 
गेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती नव्हती. तसेच, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीही नव्हती. यामुळे हे चारही प्रमुख पक्ष स्वतंत्र लढले होते. यंदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या युतीबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तथापि, तोपर्यंत सर्व विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना निवडणुकीची तयारीचे आदेश पक्षाने दिले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीला गतवैभव प्राप्त करून देण्याचा चंग पक्षाने बांधला आहे. या पार्श्‍वभूमीवर गुरुवारच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com