#कारणराजकारण : चिंचवडकरांचा पाणीप्रश्‍न सुटेना

Water Issue
Water Issue

चिंचवड विधानसभा वार्तापत्र
पुणे - नागरी सुविधांची वानवा, अपुरा पाणीपुरवठा, रखडलेली विकासकामे यांसह कचरा व वाहतूक कोंडीसारख्या समस्यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिक त्रस्त आहेत. पाणीप्रश्‍न सोडण्यासाठी भामा आसखेड धरणातून वाढीव कोटा घेण्यात आला असला, तरी स्थानिकांची तहान अद्याप कायमची भागलेली नाही.

विकासकामांमुळे होणाऱ्या असुविधा, पुराच्या पाण्यामुळे होणारे नुकसान, अपुरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आदी समस्या मार्गी लावाव्यात, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत. महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा, बोअरिंगचे पाणी आणि टॅंकर अशा तीनही स्रोतांवर अवलंबून राहिल्याशिवाय पाणी पुरत नसल्याची स्थिती अनेक ठिकाणी आहे. 

गेल्या काही वर्षांत या विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बांधकाम झाले आहे. आयटी कंपनी आणि त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पिंपळे गुरव, पिंपळे निलख आणि पिंपळे सौदागर अशा प्राइम लोकेशनवर अनेक मोठ-मोठे गृह प्रकल्प उभारण्यात आले आहेत. अशीच स्थिती सांगवी परिसरात आहे. त्यामुळे येथील मूलभूत सुविधांवर ताण निर्माण झाला आहे.

स्मार्ट सिटीचे कामे सुरू असून, त्यांना गती देखील आहे. मात्र त्यासाठी अनेक ठिकाणी रस्ते खांडून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सर्वत्र चिखल होत आहे. पिंपळे गुरवमधील मिरॅकल गार्डन व सौदागारमधील लिनिअर गार्डनचे काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे. 

रिंगरोड बाधितांचे प्रश्‍नदेखील अद्याप मिटलेले नाहीत. पवना व मुळा नदीचा जुन्या सांगवीत संगम होतो.जोराचा पाऊस झाल्यास किंवा नदीमधील विसर्ग वाढवला, तर या परिसरात अनेकांच्या घरात नदीचे पाणी घुसते. गेल्या महिन्यात पुराच्या पाण्यामुळे हजारो कुटुंबे बाधित झाली होती. जुन्या सांगवीतील मधुबन सोसायटीला पुराच्या पाण्याचा धोका आहे. तेथील रस्तेदेखील अपुरे पडत आहेत. 

वाढत्या नागरीकरणामुळे येथील अनधिकृत बांधकामदेखील वाढत आहे. राजकीय व प्रशासकीय वरदहस्तामुळे पवना नदी पात्रात अनधिकृत बांधकामांना पेव फुटले आहे. त्यामुळे नदीचे पात्र कमी झाले आहे. बीआरटी व पीएमपीचे अनेक मार्ग या मतदारसंघातून जातात. मात्र ही सर्वाजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी पडत आहे. त्यामुळे नागरिकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे.

मतदारांच्या प्रतिक्रिया 
शकुंतला वाघमारे रस्त्यावरील शितोळेनगर ते ममतानगर दरम्यानची अनेक घरे रस्ता रुंदीकरणासाठी पाडली. मात्र अनेक महिने उलटल्यानंतरही रस्त्यांचे रुंदीकरण झाले नाही. आता त्या मोकळ्या जागेवर वाहने लावण्यात येत आहेत. तेथे अनेक गैरप्रकार होत आहेत. 
- सुजाता निकाळजे

पिंपळे सौदागरसारख्या विकसित परिसरात चांगल्या प्रकारच्या मूलभूत सुविधा वाढत आहेत. मात्र सांगवीत सुधारणांना वाव असून देखील तेथे नागरी सुविधा उभारण्यात आलेल्या नाहीत. सर्व परिसरात सारखा विकास झाला पाहिजे.
- सायली शहापुरे 

खेळाची मैदाने आहेत. त्यात अनेक खेळांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र त्यांची योग्य देखभाल घेतली जात नाही. त्यामुळे त्यांचा पुरेपूर फायदा घेत येत नाही. येथील तरुण खेळाडूंना चांगले मार्गदर्शन मिळाले तर ते राज्य, देश पातळीवर खेळू शकता. 
- प्रथमेश दळवी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com