#कारणराजकारण : ‘त्या’ २२ गावांमुळे तापणार हवा (व्हिडिओ)

Shirsatwadi
Shirsatwadi

दोन नद्या जवळ असूनही इंदापूर मतदारसंघातील २२ गावांत पाण्याचे दुर्भिक्ष आहे. पाण्याअभावी पशुधनाचेही हाल आहेत. उजनी जलाशयात तीन वर्षे मत्स्यबीज न सोडल्याने मच्छीमारांचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. राजकीय साठमारीत मतदारसंघातील प्रश्‍न दुर्लक्षित राहात असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

नीरा नदी ५ किलोमीटरवर तर भीमा नदी १२ किलोमीटरवर... दोन्ही नद्यांना भरपूर पाणी.. पण, दोन्ही नद्यांच्या मध्यभागी वसलेली २२ गावे पिण्याच्या आणि शेतीसाठीच्या पाण्यापासून वंचित, अशी परिस्थिती आहे.

इंदापूर विधानसभा मतदारसंघात. रेडणी, निमसाखर, निरवांगी, बावडा आदी परिसरातील गावांमध्ये तर अजूनही जिल्हा परिषदेच्या टॅंकरच्या माध्यमातून पाणी पुरविले जात आहे. एकीकडे जिल्ह्यात सर्वत्र पाऊस असताना इंदापूर परिसरात मात्र, दुष्काळाची झळ आहे. रेडणी गावात सोनाई दूध संस्थेतर्फे चारा छावणी सुरू आहे. त्यात १२०० जनावरे आहेत. तालुक्‍यात एकूण ९ चारा छावण्या सुरू आहेत. त्यात सुमारे १५ हजार जनावरे असल्याचे ग्रामस्थ सांगतात.

शेतीचाही प्रश्‍न तेवढाच गंभीर झाला आहे. या गावांत पेरण्या झाल्या होत्या. पण पावसाअभावी त्या जळून गेल्या. वीर धरणातून पाण्याचे आवर्तन नियमितपणे सोडले तर, या २२ गावांचा शेतीचा प्रश्‍न सुटू शकतो. त्यासाठी पैसे भरण्याचीही तयारी आहे. मात्र, स्थानिक राजकारणामुळे पाणी सोडले जात नाही, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. गेल्या ४०- ५० वर्षांपासून हा प्रश्‍न प्रलंबित असून यंदाच्या निवडणुकीत त्याची तड लावण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. लगतच्या बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार अनेक वर्षे आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, पवार तसेच इंदापूर मतदारसंघातील माजी आमदार हर्षवर्धन पाटील राज्यस्तरीय नेते आहेत, तरीही या २२ गावांचा पाणी प्रश्‍न न सुटल्यामुळे शेतकरी नाराज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रेय भरणे विद्यमान आमदार आहेत. 

या मतदारसंघातील भिगवण हे पुणे- सोलापूर रस्त्यावरील प्रसिद्ध गाव. उजनी जलाशयातील माशांवर भिगवणची बाजारपेठ अवलंबून आहे. येथे सुमारे ५०- ६० हॉटेल आहेत. माशांची रोज सुमारे ५० लाखांची उलाढाल होते. मासेमारीसाठी ठेकेदारी रद्द केल्यापासून मत्स्यबीज सोडायचे कोणी, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पुण्यातून ‘उजनी’मध्ये येणारे पाणी दूषित असल्यामुळे काठांवरील गावांमध्ये आरोग्याच्या तक्रारी असून त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. दूषित पाणी शुद्ध करण्यासाठी पुणे महापालिकेने मुंढवा जॅकवेल प्रकल्प राबविला. पण, तो अयशस्वी ठरल्यामुळे पाण्याचा दर्जा दिवसेंदिवस खालावत आहे.

मतदारांच्या प्रतिक्रिया 
राजकीय नेत्यांनी मनात आणले तर, २२ गावांसाठी पाण्याची योजना मार्गी लावणे शक्‍य आहे. राज्य सरकार किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनही हे शक्‍य आहे. त्याला खूप मोठा खर्च नाही. मात्र, इच्छाशक्ती हवी.
- नंदकुमार रणवरे 

जवळ दोन नद्या असूनही शेतीसाठी पाणी नसल्यामुळे पशुधनाचे हाल होत आहेत. सोनाई दूध संस्थेकडून चारा छावणीसाठी मदत मिळाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी उपाययोजना करायला हव्यात. 
- दशरथ पोळ

उजनीच्या जलाशयात मत्स्यबीज टाकणे गरजेचे आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते टाकले जात नाही. त्यामुळे माशांची संख्या वाढण्यावर मर्यादा आल्या आहेत. भिगवणमधील मच्छी बाजारासाठी या बाबतच्या उपाययोजना आवश्‍यक आहेत. 
- अजिंक्‍य माडगे

‘सरकारनामा’ आणि www.esakal.com वरून ‘सकाळ’ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. आपल्यालाही यामध्ये सहभागी व्हायला आवडेल?

आपली मते मांडा 
व्हॉट्‌सॲप क्रमांक - ९१३००८८४५९
ई-मेल webeditor@esakal.com (ई-मेलचा subject: #कारणराजकारण)
फेसबुक’वर फॉलो करा fb.com/SakalNews
आपले मत ट्विट करा #कारणराजकारण हा हॅशटॅग वापरून

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com