Vidhansabha 2019 : पिंपरीतून महिला आमदार शक्‍य

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

चिंचवड, मावळात कोणी नाही
चिंचवड व लगतच्या मावळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी सध्या एकही महिला इच्छुक नाही. २०१४ मध्ये नीता ढमाले व स्मिता बोडके या दोन महिला चिंचवडच्या उमेदवार होत्या; परंतु, त्यांचा फारसा प्रभाव दिसला नव्हता. मावळातून गेल्या वेळेसही सर्व उमेदवार पुरुषच होते.

पिंपरी - काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीची इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. यात शहरातील तीनपैकी पिंपरी मतदारसंघात इच्छुक महिलांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांच्यात चुरस निर्माण आहे. २०१४ मध्येच भाजप आरपीआयच्या उमेदवार चंद्रकांता सोनकांबळे या कमळ या चिन्हावर लढल्या असत्या तर या मतदारसंघातून त्या पहिल्या महिला आमदार ठरल्या असत्या. यंदाही एखाद्या महिलेला मोठ्या पक्षाची उमेदवारी मिळाल्यास पिंपरीतून महिला आमदार होणे शक्‍य आहे.

लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची २००८ मध्ये पुनर्रचना झाली. शहरात पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आले आणि राजकीय समीकरणे बदलली. पिंपरी मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने प्रथम राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांना संधी मिळाली.

सध्या शिवसेनेचे ॲड. गौतम चाबुकस्वार नेतृत्व करीत आहेत. आगामी निवडणुकीसाठी दोघेही इच्छुक आहेत. अन्य इच्छुकांमध्ये महिलांची संख्या मोठी आहे. पिंपरीच्या तुलनेत चिंचवड व भोसरीत ती कमी आहे.

पिंपरीतून २०१४ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनिता सोनवणे, रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) चंद्रकांता सोनकांबळे, रिपब्लिक रक्षकच्या मंगल कांबळे, राष्ट्रीय वाल्मीकी सेनेच्या सुनीता छाजछिडक, अपक्ष आशा रणदिवे व मीना खिलारे यांनी निवडणूक लढवली. सोनकांबळे यांना तिसऱ्या क्रमांकाची ४७ हजार २८८ मते मिळाली. झालेल्या एकूण मतदानात त्यांची टक्केवारी २६.७३ होती. त्यांना भाजपचा पाठिंबा होता.

विजयी झालेले ॲड. चाबुकस्वार यांच्यापेक्षा सोनकांबळे यांना केवळ तीन हजार ८०६ मते कमी होती. मात्र, कमळ चिन्ह असते तर त्या विजयी झाल्या असत्या असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. आता भाजप-शिवसेना युती न झाल्यास किंवा युतीच्या जागावाटपात पिंपरी मतदारसंघ भाजपकडे आल्यास निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक महिलांची संख्या जास्त आहे.

यात सोनकांबळे यांच्यासह खासदार अमर साबळे यांची कन्या वेणू, नगरसेविका सीमा सावळे यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीकडून नगरसेविका सुलक्षणा धर यांनीही विधानसभेची तयारी सुरू केली आहे. 

भोसरीतून दोनच महिला
भोसरी मतदारसंघात भाजपकडून एकही महिला इच्छुक नाही. मात्र, शिवसेनेच्या सुलभा उबाळे आणि राष्ट्रवादीच्या नगरसेविका मंगला कदम इच्छुक आहेत. उबाळे यांनी २००९ व २०१४ ची निवडणूक लढविली आहे. २००९ मध्ये त्यांचा केवळ एक हजार २७२ मतांनी पराभव झाला होता. कदम तिसऱ्या स्थानावर होत्या. २०१४ मध्ये उबाळे दुसऱ्या क्रमांकावर होत्‍या. त्या वेळी नामसाधर्म्य असलेल्या सुलभा गणपती उबाळे रिंगणात होत्या. मात्र, त्यांचा फारसा प्रभाव पडला नव्हता.

Web Title: Vidhansabha Election 2019 Pimpri Constituency Women Politics