ड्रीम प्रोजेक्टसाठी विजय शिवतारे डायलिसीसपूर्वी फिल्डवर

श्रीकृष्ण नेवसे
Saturday, 19 September 2020

पुरंदर, भोर व वेल्हे तालुक्यास सिंचनासाठी लाभदायक ठरणाऱ्या गुंजवणी प्रकल्पाच्या पाइप निर्मिती प्रकल्पास माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी भेट दिली. किडनीच्या आजाराने ग्रस्त असतानाही त्यांनी आपल्या या ड्रीम प्रोजेक्टची पाहणी केली.

सासवड (पुणे) : पुरंदर, भोर व वेल्हे तालुक्यास सिंचनासाठी लाभदायक ठरणाऱ्या गुंजवणी प्रकल्पाच्या पाइप निर्मिती प्रकल्पास माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी भेट दिली. किडनीच्या आजाराने ग्रस्त असतानाही त्यांनी आपल्या या ड्रीम प्रोजेक्टची पाहणी केली. गुंजवणीचे पाणी शेतकऱ्यांना दिल्याशिवाय मी मरणार नाही. मी या योजनेत प्राण फुंकलेत, असे ते या वेळी म्हणाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिवतारे यांनी पांडे (ता. भोर) येथे गुंजवणी प्रकल्पासाठी सुरू असलेल्या पाइप बनवण्याच्या प्रकल्पाला काल भेट दिली. गुंजवणी पाईपलाईनच्या कामाचा आढावा घेत कामाचा वेग वाढवण्याच्या सूचना त्यांनी या वेळी एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांसह जलसंपदा विभागाला दिल्या. या वेळी माजी सभापती अतुल म्हस्के, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, हरिभाऊ लोळे, युवासेनेचे अध्यक्ष मंदार गिरमे, सासवड शहरप्रमुख अभिजित जगताप, समीर जाधव,  कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांच्यासह एल अँड टी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शिवतारे म्हणाले की, गुंजवणी हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. गुंजवणी धरण विक्रमी वेळेत पूर्ण करून देशातील पहिली बंद पाइपलाइन योजना गुंजवणीसाठी मंजूर करून घेतली होती. या पाइपलाइनचे काम एल अँड टी या विख्यात कंपनीकडे असून, कंपनीने पांडे येथे 68 एकर क्षेत्रावर पाईपनिर्मिती आणि साठवण सुरू केलेली आहे. 60 किलोमीटरपर्यंत काम पूर्ण होईल, एवढे पाइप सध्या तयार आहेत. उपवितरीकांसाठी लागणारे छोटे पाइप हे थेट कोलकत्याहून येत असून, टाटा समूह स्वतः हे पाइप तयार करीत आहे.  

 

पुण्यात लर्निंग लायसन्स टेस्ट आता सकाळी साडेसात पासूनच 

काही लोक काहीच कळत नसताना उगाच भलतेच मुद्दे चघळत बसत आहेत. सध्या पाइप लाईन होणं आणि पाणी पोहोचणं काळाची गरज आहे. आवश्यकतेनुसार प्रकल्पाच्या लाभक्षेत्राबाबत पुढे निर्णय घेता येतात. देशातील नामवंत तज्ज्ञांसह ही योजना आकाराला आली आहे. केंद्र सरकारने त्यावर प्रभावित होऊन संबंध देशात बंद पाइपलाइनचे धोरण स्वीकारलं आहे, असे शिवतारे यांनी सांगितले. 

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी आपण चर्चा केलेली असून, या कामाला निधीची अडचण होऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे. ज्या कामासाठी मी माझं आयुष्य आणि शरीर पणाला लावलं, ते पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.
 - विजय शिवतारे, माजी राज्यमंत्री

 

 

प्रकल्पाची वैशिष्ट्ये   

  1. सिंचनाखालील क्षेत्र :  वेल्हे तालुका-  850 हेक्टर, भोर तालुका– 9435हेक्टर, पुरंदर तालुका– 11 हजार 107 हेक्टर. 
  2. 365 दिवस 24 तास पाणी उपलब्धता,  शेतकऱ्यांना त्यांच्या सोयीनुसार पिके घेण्याचे स्वातंत्र्य, ठिबक किंवा पाट पद्धतीने पाणी वापरण्याची शेतकऱ्यांना मुभा
  3. 2400 मि.मी. व्यासाचा पाइप, आवश्यक तेथे स्लुईस व एअर वॉल्व्ह.
  4.  जवळपास 60 किलोमीटर काम पूर्ण होईल एवढे पाइप तयार 
  5. पाईपला गंजरोधक रंगकाम आणि बाहेरच्या बाजूने सिमेंटचा थर 
  6. गावपातळीवरील उपवितरीकांसाठी थेट कलकत्त्याहून छोट्या पाईपची आवक सुरू

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijay Shivtare on the field before dialysis for Dream Project