अरे नक्की चाललंय काय?; अजित पवारांनंतर शरद पवार यांची शिवतारेंनी घेतली भेट

श्रीकृष्ण नेवसे
Sunday, 27 September 2020

पुरंदर तालुक्‍यातील कोरोना परिस्थितीवर चर्चा; उपाययोजनासंबंधी मंत्री, अधिकाऱ्यांना सूचना 

सासवड (पुणे) : पुरंदर तालुक्‍यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शिवसेना नेते व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची धावपळ अद्याप सुरूच आहे. रविवारी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुंबईत सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. कोरोनामुळे जर्जर झालेल्या पुरंदर तालुक्‍याची सर्व परिस्थिती पवार यांच्या निदर्शनास आणून देत करावयाच्या उपाययोजनासंबंधी त्यांच्याशी चर्चा केली. पवार यांनी याबाबत तत्काळ सर्व संबंधित विभागाचे मंत्री आणि अधिकारी यांना दूरध्वनी करून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. 

पुण्यातल्या कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेली तरुणी सापडली

या भेटीबाबत शिवतारे म्हणाले, ""सासवड येथील प्रशासकीय इमारतीत स्वच्छता, वीज आणि पाणी यासारख्या सुविधा ताबडतोब करून तिथे कोविड सेंटर करण्याबाबत पवार यांना विनंती केली. त्याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांना पवार यांनी तत्काळ सूचना दिल्या. नीरा मार्केट समितीचा सासवड येथील बाजार सध्या कोरोनामुळे दिवे येथील क्रीडा संकुलाच्या जागेवर स्थलांतरित करावा आणि सासवड व जेजुरी ग्रामीण रुग्णालयांना ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्यावेत, रुग्णांना रुग्णवाहिका वेळेवर मिळाव्यात, अशा विविध मागण्या केल्या होत्या.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नीरा मार्केट समितीचा सासवड येथील घाऊक बाजार कायमस्वरूपी दिवे येथे उभारण्यासाठीच्या प्रस्तावास राज्यमंत्री असताना मंजुरी घेतलेली आहे. परंतु जागा हस्तांतरासाठी महसूल विभागाने बाजार समितीकडे दोन कोटी रुपये भरण्याबाबत मागणी केली होती. बाजार समिती आर्थिकदृष्ट्या फारशी सक्षम नसल्याने ही जागा नाममात्र दरात द्यावी; अशी मागणी पवार यांच्याकडे केली असता याबाबत त्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना ताबडतोब तशा सूचना दिल्या.'' 
 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

"गुंजवणी' ड्रीम प्रोजेक्‍ट असून प्रकल्पाचे काम जोरात सुरू आहे. त्याच्या निधीमध्ये कोरोनामुळे कपात करू नये आणि प्रकल्पाला सहकार्य करावे, अशी मागणी शरद पवार यांच्याकडे केली. 
- विजय शिवतारे, माजी राज्यमंत्री 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijay Shivtare met Sharad Pawar