‘कुमारी मातां’ची अघोरी कहाणी

Mother
Mother

सात वर्षांत ३४२ मुली ठरल्या बळी; संख्या मोठी असण्याची भीती
पिंपरी - शहरातील एका हौसिंग सोसायटीत रखवाली करणाऱ्या कुटुंबातील ‘ती’. वयवर्षे अवघे तेरा. काही शारीरिक त्रास होत असल्याने आई-वडील तिला रुग्णालयात घेऊन आले. तपासणी केल्यानंतर ‘ती’ पाच महिन्यांची गरोदर असल्याचे आढळले. घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकली. अशाच प्रकारे पिंपरी-चिंचवड शहरात विविध कारणांमुळे गेल्या सात वर्षांत तब्बल ३४२ जणी ‘कुमारी माता’ झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. उजेडात आलेली ही आकडेवारी केवळ महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) आहे. खासगी रुग्णालयातील संख्या अधिक असल्याची शक्‍यता आहे.

मातृत्व शब्दाला सामाजिक प्रतिष्ठा आहे. मात्र, हेच मातृत्व जेव्हा जबरीने लादले जाते तेव्हा ते ‘सामाजिक समस्या’ बनते. विभक्त कुटुंबाची संख्या वाढत आहे. लग्नाचे आमिष दाखवून मुलींना जाळ्यात ओढले जाते. अनेकदा नातलगाकडूनच लैंगिक अत्याचार झाल्याने मुलींवर कोवळ्या वयात ‘कुमारी माता’ होण्याची वेळ ओढवत आहे. सरकारकडून गोपनीयतेच्या नावाखाली संख्या जाहीर केली जात नसली, तरी ‘कुमारी माता’ची समस्या उग्र रूप धारण करीत आहे, याचा कुणाला पत्ताच नाही.

शहरात प्रामुख्याने महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरी रुग्णालयात ‘या’ मातांना दाखल केले जाते. गेल्या वर्षात या प्रकरणातील ४८ कुमारी मातांची नोंद आहे. त्यापैकी १५ ते १८ या वयोगटातील २७ मुली माता झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. दरमहा शहरासह आजूबाजूच्या ग्रामीण भागातून किमान सात कुमारी माता ‘वायसीएम’मध्ये दाखल होतात. यातील बहुतांश मुलींचे पालक हे मुलीला तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यात पाळी न आल्याने घेऊन येतात. पोलिसांकडून या केसेस येतात. यात गरीबच नव्हे, तर मध्यमवर्गीय आणि श्रीमंतांमधील केसेसही दाखल झालेल्या आहेत.

समाजसेवी संस्थांचा स्वार्थ
कायद्यानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याशिवाय गर्भपात होत नसल्याने पालक बदनामीला घाबरून समाजसेवी संस्थांची मदत घेतात. या मुलींचे महिने पूर्ण होईपर्यंत त्यांना संस्थेत ठेवले जाते. त्यांना जवळच्या पालिका रुग्णालयात दाखल करून प्रसूतीनंतर त्यांना पुन्हा संस्थेत नेले जाते. पण, अनेकदा या मुलींना लवकर दवाखान्यात नेण्यात येत नाही. त्यांचे महिने पूर्ण होण्याची वाट पाहिली जाते. अनेक वेळा अल्पवयीन मुलींचे ‘सिझर’ करावे लागते. परिणामी, ती आयुष्यातून उठते.

ऐंशी टक्के प्रकरणे दडपतात
एकीकडे अनैतिक संबंधांतून जन्माला आलेले मूल अनाथालयाकडे सोपविण्याची घाई केली जाते. दुसरीकडे कमी वयातच तिचे लग्न लावून दिले जाते. त्यानंतर या बाळांचे काय होते, हा प्रश्‍न अनुत्तरित राहतो. कोवळ्या वयात मातृत्व लादलेले मोकाट फिरतात. कुटुंबाची बदनामी नको म्हणून ८० टक्के प्रकरणे दडपली जातात. सर्व दोष मात्र कुमारी मातेच्या पदरी पडतो. 

पालकांनो, मुलांवर लक्ष द्या
अल्पवयीन (१८ वर्षांच्या आतील) कुमारी माता प्रकरणांत मुलींबरोबरच मुलांचे आयुष्यही उद्‌ध्वस्त होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर मुलीचा गर्भपात होतो आणि तिची सुटका होते. मात्र, संबंधित मुलावर ‘पॉक्‍सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होतो. या प्रकरणात पीडित मुलीची किंवा तिच्या घरच्यांचीही संबंधित मुलाविरुद्ध काही तक्रार नसली, तरी कायद्याने ती करणे बंधनकारक आहे. त्यानंतरच गर्भपात करण्यात येतो, असे कायदेतज्ज्ञांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com