'मिठी मारून रडणे वैज्ञानिक संस्थेच्या प्रमुखांना न शोभणारे'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

मोहीम फत्ते झाली की टाळ्या वाजवून माफक आनंद साजरा करणे आणि मोहीम अयशस्वी झाली तर कारणमीमांसा करून दुसऱ्या दिवशी पुन्हा कामाला लागणे, हीच इस्रो संस्कृती आहे. तीच रहावी.

- विश्वंभर चौधरी, सामाजिक कार्यकर्ते

पुणे : चांद्रयान - 2 मोहीम यशस्वी झाली नाही. त्यानंतर इस्रोचे प्रमुख के. सिवन यांना भावना अनावर झाल्या. त्यामुळे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर भावूक झाले. हे पाहिल्यानंतर मोदींनी त्यांना मिठी मारत धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता याच मुद्द्यावरून सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी त्यांच्यावर टीका केली. 'मिठी मारून रडणे वैज्ञानिक संस्थेच्या प्रमुखांना शोभणारे नाही, असे ते म्हणाले.

विश्वंभर चौधरी यांनी याबाबतची पोस्टच फेसबुकवर लिहिली आहे. त्यामध्ये चौधरी म्हणाले, की चांद्रयान मोहीम यशस्वी झाली नाही. ही बातमी दुःखदायक आहे. पण इस्रो प्रमुख भावविवश झाले, ही बातमी भीतीदायक आहे. कुठल्याही गोष्टीचे श्रेय घेणे वगैरे मिठी संप्रदायातील राजकारण्यांना शोभते. मात्र, मिठी मारून रडणे एका वैज्ञानिक संस्थेच्या प्रमुखास नक्कीच शोभत नाही. सिवन भावविवश झाले असले तरी आपल्या या भावूकतेचाही प्रचारासाठी उपयोग केला जाऊ शकतो, हे भान तरी त्यांनी ठेवायला हवे होते.

तसेच ते पुढे म्हणाले, मोहीम फत्ते झाली की टाळ्या वाजवून माफक आनंद साजरा करणे आणि मोहीम अयशस्वी झाली तर कारणमीमांसा करून दुसऱ्या दिवशी पुन्हा कामाला लागणे, हीच इस्रो संस्कृती आहे. तीच रहावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vishwambhar Choudhari ISRO K Sivan Narendra Modi Chandrayaan 2 Lander Moon Mission