‘ड’ जीवनसत्त्व मोजणे झाले सोपे

अक्षता पवार @Akshataspawar
Sunday, 22 November 2020

लहान मुलांमध्ये सामान्यतः ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता आढळते. शरीरातील विविध अभिक्रिया आणि रोगप्रतिकारशक्ती विकसित करण्यामध्ये या जीवनसत्त्वाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे; परंतु लहान मुलांचे रक्त काढून ही चाचणी करणे आव्हानात्मक असते. यावर उपाय म्हणून अतिशय सुलभ अशी ‘ड्राइड ब्लड स्पॉट’ पद्धत विकसित करण्यात आली आहे.

पुणे - लहान मुलांमध्ये सामान्यतः ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता आढळते. शरीरातील विविध अभिक्रिया आणि रोगप्रतिकारशक्ती विकसित करण्यामध्ये या जीवनसत्त्वाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे; परंतु लहान मुलांचे रक्त काढून ही चाचणी करणे आव्हानात्मक असते. यावर उपाय म्हणून अतिशय सुलभ अशी ‘ड्राइड ब्लड स्पॉट’ पद्धत विकसित करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) व हिराबाई कावसी जहाँगीर मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीने हे संशोधन करण्यात आले आहे. यात डॉ. अनुराधा खाडिलकर, रश्‍मी लोटे, श्रीराम कुलकर्णी, ज्वाला पवार, प्रसन्ना सणस, लेहा काजळे, केतन गोंधळेकर, वामन खाडिलकर व डॉ. सिद्धेश कामत यांचा समावेश आहे. या संशोधनाची माहिती सायंटिफिक रिपोर्ट या वैज्ञानिक नियतकालिकेमध्ये प्रकाशित झाली आहे. विविध रोगांच्या निदानासाठी मोठ्या संख्येने जास्तीत जास्त लोकांची चाचणी करावी, या अनुषंगाने ही प्रणाली विकसित करण्याचा मुख्य उद्देश होता. मात्र या पद्धतीमुळे शालेय मुलांमधील ‘ड’ जीवनसत्त्वाचे प्रमाण मोजणे अधिक सोपे झाले आहे. 

बर्निंग कारचे गूढ; कशी पेटली, वाहनात किती प्रवासी होते, माहिती उपलब्ध नाही

‘ड’ जीवनसत्त्वाचे महत्त्व
मानवी शरीरातील हाडांच्या पोषणासाठी, स्नायूंच्या हालचालीसाठी आणि विविध शारीरिक कार्यासाठी ‘ड’ जीवनसत्त्वाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हात बसल्यावर शरीरातील पेशी ‘ड’ जीवनसत्त्वाची निर्मिती करतात. ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास हाडांशी निगडित विकार होऊ शकतात. परिणामी स्नायूंवरही परिणाम होतो.

संशोधनातील निष्कर्ष 

  • ‘ड्राइड ब्लड स्पॉट’च्या माध्यमातून व्हिटॅमिन ‘डी’चे मूल्यांकन करणे सोपे 
  • रक्तातील इतर घटकांचा अभ्यास करण्यासाठी ही पद्धत उपयुक्त 
  • फिल्टर पेपरवर सुकविण्यात आलेल्या रक्ताला प्रयोगशाळेत पाठवणे सोपे
  • या प्रणालीचा वापर रोगपरिस्थितीच्या अभ्यासासाठी होऊ शकतो

Bharat ke Mahaveer: पुण्याचा रिक्षावाला दिसणार 'डिस्कव्हरी'वर; लॉकडाउनमध्ये स्थलांतरितांना केली होती मदत!

ही प्रक्रिया सुलभ कशी 

  • सध्या उपलब्ध चाचणी पद्धतीत जास्त रक्ताची गरज भासते
  • रक्‍त साठविण्यासाठी उणे २० अंश सेल्सिअस तापमानाची आणि विविध उपकरणांची आवश्‍यकता असते
  • रक्तातील घटकांचे प्रमाण तपासण्यासाठी महागड्या उपकरणांची गरज
  • नव्या पद्धतीत यासारख्या कोणत्याही पूर्ततेची आवश्‍यकता नाही. तसेच रक्‍ताचा सुकलेला थेंब जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यातील घटकांचे प्रमाण तपासता येईल.

संशोधनाचे फायदे 

  • लहान मुले सुयांना घाबरतात, अशा वेळी त्यांच्या शरीरातील रक्त नमुना घेणे आव्हानात्मक ठरते. त्या तुलनेत ही पद्धत सोपी आहे.
  • रक्ताचे चार थेंब जरी मिळाले तरी त्यातील ‘ड’ जीवनसत्त्वाचे प्रमाण ओळखणे शक्‍य होते.

सध्याची परिस्थिती पाहता ही नवीन प्रणाली नक्कीच सहायक ठरेल. ‘ड’ जीवनसत्त्व हे शरीरासाठी गरजेचे असलेले घटक असून, लहान मुलांमध्ये याची सर्वाधिक कमतरता पाहायला मिळते. त्यामुळे आता या प्रणालीचा वापर करत लहान मुलांच्या शरीरातील ‘ड’ जीवनसत्त्वाचे मूल्यांकन करणे सुलभ झाले आहे. 
- डॉ. अनुराधा खाडिलकर, जहाँगीर रुग्णालय 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vitamin D became easier to measure