'फी'न भरल्यामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण रोखताय? शिक्षण विभागाचा शाळांना कडक इशारा

School_Fees
School_Fees

पुणे : तुम्ही शाळेचे शुल्क भरले नाही, म्हणून तुमच्या पाल्याला ऑनलाइन शिक्षणातून 'ब्लॉक' केले जातंय का? अहो, तुमच्या मुलांबाबत हे घडत असले तर जरा इकडे लक्ष द्या. शुल्कासाठी सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेचे शुल्क भरण्यासाठी दबाव टाकणाऱ्या शाळांवर आता शिक्षणाधिकाऱ्यांची करडी नजर असणार आहे.

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पालकांना शुल्क भरताना अडचणी येत आहे. मात्र तरी देखील शाळांकडून पालकांना शुल्क भरण्याची सक्ती केली जात आहे. शाळेचे शुल्क न भरल्यास विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध प्लॅटफॉर्मवरुन 'ब्लॉक' करण्याचे प्रकार घडत आहेत. काही शाळांनी शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षणच बंद करत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता शिक्षण विभागाने अशा शाळांवर कडक कारवाई करण्याचे ठरविले आहे. त्याप्रमाणे पुणे विभागाचे प्रभारी उपसंचालक वैजनाथ खांडके यांनी पुण्याबरोबरच सोलापूर आणि नगर येथील  माध्यमिक शाळांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना शाळांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

"पालकांनी शुल्क भरले नसल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी लिंक न पाठविणे, ऑनलाइनसाठी असणारा पासवर्ड न देणे अशा स्वरूपाच्या तक्रारी येत आहेत. पालकांनी शाळेची फी भरणे आवश्यक आहे. मात्र पालकांनी शाळा व्यवस्थापनाशी बोलून फी भरण्यात सवलत मिळावी, यासाठी स्वतंत्ररित्या चर्चा करावी. कोरोनाच्या काळात सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी विद्यार्थी आणि पालकांकडून चालू वर्षाची आणि आगामी वर्षाचे शुल्क जमा करण्याची सक्ती करू नये, असे राज्य सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. असे असतानाही केवळ शुल्क न भरल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबणार नाही, असा जिल्ह्यातील शाळांना आदेश द्यावा. तसेच आदेशाप्रमाणे कार्यवाही न करणाऱ्या शाळांवर कारवाई करावी, असा आदेश खांडके यांनी दिला आहे.

"शाळेचे शुल्क न भरल्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद केल्याच्या आतापर्यंत सहा ते सात तक्रारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे आल्या आहेत. शिक्षण उपसंचालकांनी दिलेल्या आदेशानुसार 'शुल्क भरले नसल्याच्या कारणामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबविण्यात येऊ नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल', असे पत्र संबंधित शाळांना पाठविण्यात आले आहे. शाळांनी आदेशाप्रमाणे कार्यवाही न केल्यास कडक कारवाईचा बडगा उगारण्यात येईल."
- गणपत मोरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक, जिल्हा परिषद)

"कोरोनाच्या संकट काळात शाळांनी पालकांकडे शुल्कासाठी तगादा लावू नये,असे राज्य सरकारमार्फत सांगितले जात आहे. परंतु शाळा सरकारी आदेशाला जुमानत नसल्याचे दिसून येते. आजही शाळा शुल्क न भरल्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद करत आहेत. अशा परिस्थितीत शाळांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे."
- नंदकुमार गोसावी, पालक

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com