राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान करा...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

'सोशल मीडिया' वरून विविध पक्षांचे उमेदवार, सामाजिक संस्था -संघटनांचे आवाहन

'सोशल मीडिया' वरून विविध पक्षांचे उमेदवार, सामाजिक संस्था -संघटनांचे आवाहन
पिंपरी - 'मतदान हा अधिकारच नाही तर राष्ट्रीय कर्तव्य आहे. मतदान करा, फरक पडतो!.. आपले मतदान कोणत्या केंद्रावर आहे. हे जाणून घेण्यासाठी कृपया... क्रमांकावर दूरध्वनी करा. मी माझा मतदानाचा हक्क बजाविला आणि तुम्ही? "व्होट फॉर ट्रान्स्परन्सी' या सारखे अभिप्राय देऊन "सोशल मीडिया' वरून विविध पक्षांचे उमेदवार, सामाजिक संस्था -संघटना हे मतदारांना मतदानासाठी मंगळवारी दिवसभर प्रोत्साहित करत होते.

मागील काही निवडणुकांपासून सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी खालावत चालली आहे. त्यामुळे मतदारांना मतदानासाठी अधिकाधिक प्रोत्साहित करण्यासाठी पिंपरी- चिंचवड महापालिका प्रशासनाकडून निरनिराळ्या उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, त्याचबरोबरीने विविध पक्षांचे उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्था-संघटना नागरिकांना मतदानासाठी "सोशल मीडिया' वरून मतदानासाठी घराबाहेर पडण्याचे आवाहन करत होते.

'मतदान केल्याचा बोटावरील शाईचा "डाग' चांगला आहे! हा डाग तुम्हाला कलंकित नाही तर मानांकित करणार आहे. रात्रंदिवस धडपडणाऱ्या मतदान यंत्रणा अन्‌ लोकशाहीला तुमचे मतदान अपेक्षित आहे. लक्षात ठेवा.. लोकशाहीचा आदर... देशाचा आदर. मतदान करा... सच्चा उमेदवार निवडा. प्रलोभनाला बळी न पडता योग्य उमेदवार निवडून सशक्त समाज घडविण्यास योगदान द्या'' असे आवाहन करण्यात आले.

'मतदान करा.. पण, मत "दान' करू नका'', 'मतदार ओळखपत्राचा उपयोग केवळ "सीम कार्ड' घेण्यासाठी करू नका'', 'योग्य उमेदवारालाच मतदान करा. योग्य वाटत नसल्यास अपक्षांना मत द्या. परंतु, "नोटा' हा पर्याय निवडू नका. मतदानाचा अधिकार तुम्हाला घटनेने दिला आहे. "नोटा'चे बटण दाबून त्या अधिकाराला पायदळी तुडवू नका'', असे अनेक "मेसेजेस्‌' आणि "पोस्ट' "सोशल मीडिया' वरून व्हायरल होत होते.

यंदा कर्तव्य आहे !
श्री निवडणूक आयोग प्रसन्न ||
सप्रेम नमस्कार! वि. वि. भारत मातेचे सुपुत्र चि."मतदार' आणि चि. सौ. कां "लोकशाही' (आपली सर्वांची लाडकी) यांच्या शुभमंगल प्रसंगी आपले बहुमूल्य मतदान करून निवडणूक कार्यक्रमाची शोभा वाढवावी. ही आग्रहाची विनंती... लोकशाही बळकट करण्यासाठी कृपया कोणी आहेर स्वीकारू नये. निवडणूक आयोगाने दिलेल्या वेळेत व वेळेपूर्वी मतदानाचा हक्क बजवावा. जागरूक नागरिक बना, मतदानाला जायचं हं.. (बालक, पालक)

चला मतदानाला चला !
"अरं... मतदारा, सांग काय करणार?
मतदानाचं दान तुझं सोन्याहून महानं रं..
मतदानाचं मोल आता आम्ही जाणणार...
एका-एका मतानंही.. पडली रं सरकारं
बंगलेवाला, फ्लॅटवाला, सायेब लई शिकलेला
नका जाऊ सहलीला.. चल भाऊ मतदानाला
हिंदू-मुस्लिम, शिख-ईसाई
सारे जन एक होई
जाती-पाती, धर्म-भाषा
गाती लोकशाही गाथा,
लाच, दारू, पैसा, अडका
भुलू नको खोट्या थापा,
भारताच्या मंदिराचा, दगडधोंडा बन आता..
महायुती-आघाडी की..
केजरीवालचा "आप' भारी
लोकशाही जगविण्याचा... एक मत भारी
भाई-ताई, आबा-दादा
सायेब, भाई-बाबा-नाना
जाहीरनामा- वचननामा.. सांगे तोचि रडगाणा..
मतदान येते जेव्हा कोणत्याही सणावारी,
दान "मत'दान करा..
हीच पंढरीची वारी
- पिठलं भाकर - राजेंद्र कोरे

Web Title: Vote as a national duty ...