उत्तर प्रदेशसह १७ राज्यांमध्ये ‘एसआयआर’

उत्तर प्रदेशसह १७ राज्यांमध्ये ‘एसआयआर’
Published on: 

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १५ : निवडणूक होणार असलेल्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबसह १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांची विशेष पडताळणी मोहीम (एसएसआर) राबविण्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. त्यानुसार आसाम, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, मणिपूर, पंजाब, राजस्थान, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल ही राज्ये आणि अंदमान व निकोबार बेटे, लक्षद्वीप, पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशांमध्ये एक जानेवारी २०२७ हा पात्रता दिनांक मानून मतदारयाद्यांची पडताळणी केली जाणार आहे.
‘एसआयआर’च्या मुद्द्यावरून दिल्लीत आंदोलन पेटले असतानाच निवडणूक आयोगाने ही घोषणा केली आहे. यासाठी निवडणूक आयोगाने संबंधित सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना सविस्तर सूचना दिल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांची पुनर्रचना येत्या दोन नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतर १२ नोव्हेंबरला एकत्रित मसुदा मतदारयादी प्रसिद्ध होईल. दावे व हरकती दाखल करण्यासाठी १२ नोव्हेंबर ते ११ डिसेंबर असा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या दावे-हरकतींची छाननी व निकाली काढण्याची अंतिम तारीख २८ डिसेंबर असून, चार जानेवारी २०२७ रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाईल. एक ऑक्टोबर २०२६ पर्यंत पात्र असलेले, एक जानेवारी २०२७ रोजी प्रथमच पात्र होणारे तसेच एक एप्रिल, एक जुलै व एक ऑक्टोबर २०२७ रोजी पात्र होणारे नागरिक यांचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश आयोगाने अधिकाऱ्यांना दिले आहेत.

आयोगाच्या अधिकाऱ्यांना सूचना
- मतदारयादी पडताळणीच्या प्रक्रियेतील सर्व अधिकारी थेट आयोगाच्या नियंत्रणाखाली
- कोणत्याही अधिकाऱ्याची बदली आयोगाच्या पूर्वपरवानगीशिवाय नाही
- कोणत्याही मतदान केंद्रावर १,२०० पेक्षा जास्त मतदार नकोत
- मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी दोन किलोमीटरपेक्षा जास्त पायपीट नको
- प्रत्येक पात्र नागरिकाचा समावेश यादीत व्हावा
- अपात्र व्यक्तींचा समावेश झाल्यास नोंदणी अधिकारी जबाबदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com